चित्रफितीचा सर्व स्तरातून तीव्र निषेध

यूटय़ूब चॅनेल एआयबीच्या चमूमधील तन्मय भट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तन्मयने अपलोड केलेल्या चित्रफितीमध्ये भारतरत्न लता मंगेशकर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चेहरे मॉर्फ करीत त्यांच्या तोंडी अश्लील भाषा घालणाऱ्या तन्मयविरोधात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे ट्विटरवर तन्मयवर टीका होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप या राजकीय पक्षांनी तन्मयवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई पोलीस या चित्रफितीची संवादप्रत पडताळून कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार असून फेसबुक आणि यूटय़ूबला पोलिसांनी या चित्रफितीचे प्रसारण थांबविण्यास (ब्लॉक) सांगितले आहे.

यूटय़ूबवर ऑल इंडिया बकचोद (एआयबी) या नावाने चॅनल असून तन्मय भट, आशीष शाक्य, गुरसिमरन खंबा, रोहन जोशी आदी कलाकार त्यात विविध विषयांवर विनोदी पद्धतीने टीका-टिप्पणी करीत असतात. मात्र, रविवारी तन्मय भट याने ‘सचिन व्हर्सेस लता सिव्हिल वॉर’ या नावाने चित्रफीत यूटय़ूब-फेसबुक पेजवर अपलोड केली. यात, विनोद कांबळी याने विराट कोहली हा सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा सरस खेळाडू असल्याच्या केलेल्या टिप्पणीवर सचिन प्रतिक्रिया देत असताना त्यात लता मंगेशकर सचिनवर शेरेबाजी करतात, असे दाखविण्यात आले आहे. मॉर्फिग या तंत्राचा वापर करत तन्मयने ही चित्रफीत तयार केली आहे. तन्मयची ही चित्रफीत प्रसारित झाल्यावर अल्पावधीतच त्याच्यावर टीकेची झोड उठण्यात आली. सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन तन्मयवर कारवाईची मागणी करणारा अर्ज दाखल केला. तर, भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली.