‘प्रभाग’फेरी : ‘डी’ विभाग कार्यालय

गिरगाव, मलबार हिल, नेपीयन्सी रोड, गावदेवी, ग्रॅन्ट रोड आणि ताडदेव असा विस्तारलेला हा विभाग. मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे कुटुंबीय पूजाअर्चा करीत असलेले मंदिर या विभागातील एक पुरातन वास्तू. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव याच विभागातील केशवजी नाईकांच्या चाळीत सुरू केला. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव गिरगावला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गिरगाव चौपाटी, राजभवन, वाळकेश्वरमधील बाणगंगा, कमला नेहरू पार्क, प्रियदर्शनी पार्क, महालक्ष्मीचे मंदिर, ऑगस्ट क्रांती मैदान आदी या विभागातील ठिळक ठिकाणे. एके काळी नारळी-पोफळीची झाडे आणि टुमदार बंगल्यांनी सजलेल्या या परिसराने कालौघात कात टाकली आणि एकमेकांना खेटून असंख्य तीन-चारमजली चाळी उभ्या राहिल्या. नोकरीधंद्याच्या निमित्ताने मुंबईची वाट धरणाऱ्या नोकरदारांची या चाळी आश्रयस्थाने बनली. मात्र गिरगावातील खोताच्या वाडीने आजही वेगळेपण जपले आहे. ख्रिश्चन बांधवांचे अनेक टुमदार बंगले पाहण्यासाठी विदेशी पर्यटक अधूनमधून तेथे भेट देत असतात. अस्सल मराठमोळा भाग म्हणून गिरगावची ओळख होती. काळाच्या ओघात या विभागाचा कायापालट झाला आणि चाळींच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहू लागले. मुख्यमंत्री, मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वास्तव्यामुळे मलबार हिल परिसराला महत्त्वाचा दर्जा प्राप्त झाला आहे. जानेवारीमध्ये मकरसंक्रांतीपासून थेट नववर्षांच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३१ डिसेंबरला या परिसरात उत्सवी वातावरण असते. त्यामुळेच येथील उत्सवांना मुंबईकर आवर्जून हजेरी लावताना दिसतात. हे एक वेगळेपण या विभागाने जपले आहे. एके काळच्या या अस्सल मराठमोळ्या परिसरातील मराठी टक्का मोठय़ा प्रमाणावर घसरला आहे. गुजराती, जैन मंडळींची संख्या गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढली आहे. त्यामुळे या भागातील राजकीय समीकरणेही बदलाच्या वळणावर आहेत.

अंतर्गत भाग :  कुंभारवाडा, माधवबाग, भुलेश्वर, चंदनवाडी, चिराबाजार, जिमखाना, मुंबादेवी, मुलजी जेठा मार्केट, धोबी तलाव, खारा तलाव, नळबाजार, घोगरी मोहल्ला परिसर.

untitled-1

अमराठी मतांवर उमेदवारांची भिस्त

अस्सल मराठमोळा परिसर म्हणून एके काळी गिरगाव, ग्रॅन्टरोड,गावदेवी, ताडदेवची ख्याती होती. त्या काळी गिरगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जात होता. अनेक कडवे शिवसैनिक याच भागातून शिवसेनेला मिळाले. त्याच्या बळावर शिवसेनेचे आमदार, नगरसेवक या विभागातून निवडून आले. लोकसभा निवडणुकीत अपवाद वगळला तर काँग्रेसने दक्षिण मुंबई मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात यश मिळविले होते. मलबार हिलमधील उच्चभ्रू व्यक्तींनी कायम काँग्रेसला साथ दिली, तर मध्यमवर्गीयांनी शिवसेना-भाजपच्या झोळीत भरभरून मते टाकली. दहा बाय दहाची खोली संयुक्त कुटुंबाला अपुरी पडू लागली, अखेर अनेक मराठी कुटुंबांनी आपापल्या जागा विकूून विरार, डोंबिवलीची वाट धरली आणि हा विभाग आपले अस्सल मराठमोळेपण हरवून बसला. गेल्या काही वर्षांमध्ये या भागात अमराठींची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. पूर्वी निवडणुकीमध्ये मराठी मते निर्णायकी ठरत होती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. अमराठींची मते मिळविण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवाराच्या विजयाची वाट सुकर होण्याची चिन्हे आहेत.

भविष्यात सहा प्रभागांत निवडणूक

पालिकेच्या मागील निवडणुकीत या विभागातील सात तीन प्रभागांत शिवसेनेने, दोन प्रभागांत भाजपने बाजी मारली होती, तर दोन प्रभाग आपल्याकडे राखण्यात काँग्रेस यशस्वी झाली होती. जनगणनेमध्ये या परिसरातील लोकसंख्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रभाग फेररचनेत या परिसरातील एक प्रभाग कमी करावा लागला आहे. कमी केलेल्या प्रभागाचा परिसर अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. परिणामी या परिसरातील एक प्रभाग कमी झाला आहे. त्यामुळे केवळ भविष्यात सहा प्रभागांमध्ये निवडणूक होईल.

विभागातील समस्या

चाळींचा प्रश्न ऐरणीवर

गिरगाव, गावदेवी, ग्रॅन्टरोड, ताडदेव आदी परिसरांत असंख्य चाळी उभ्या आहेत. त्यापैकी बहुतांश चाळी शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. धोकादायक बनल्यामुळे टेकूच्या आधारावर उभ्या असलेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही चाळींच्या जागी विकासकांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र नियम-निकषांची पूर्तता न केल्यामुळे पालिकेकडून बहुतांश इमारतींना निवासी दाखला, बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. असे असतानाही केवळ विकासकाच्या गुलाबी थापांना बळी पडून अनेक रहिवाशांनी नव्या इमारतीतील घराचा ताबा घेतला आहे. या रहिवाशांना पालिकेकडून दामदुप्पट पैसे मोजून पाणी घ्यावे लागत आहे, तर काही इमारतींना टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे. परिणामी, चाळीतून टॉवरमध्ये राहायला गेलेल्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. काही चाळी पुनर्विकासासाठी तोडण्यात आल्या असून रहिवाशांनी भाडय़ाच्या घरात आश्रय घेतला आहे; परंतु विविध कारणांमुळे पुनर्विकासाला खीळ बसल्यामुळे विकासकाने भाडे देणे बंद केले असून रहिवाशांवर आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. विकासक, इमारत मालक, भाडेकरू यांच्यातील वाद पुनर्विकासात अडथळा बनला आहे.

अपुरा पाणीपुरवठा

या परिसराला पहाटे पावणेपाचच्या सुमारास पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या परिसरातील चाळींमध्ये भल्या पहाटेपासूनच धावपळ सुरू होते. या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पहिल्या मजल्यावरही पाणी चढत नाही. पहिल्या मजल्यावरही पाण्यासाठी रहिवाशांना पंप बसवून घ्यावा लागत आहे. जोपर्यंत शेजारच्याचा पंप बंद होत नाही, तोपर्यंत दुसऱ्या घरात पाणी मिळत नाही अशी अवस्था अनेक इमारतींमध्ये आहे. त्यामुळे पाण्यावरून होणारी भांडणे नित्याचीच बनली आहेत. काही भागांतील जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून अधूनमधून त्यातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती कायम मनात घर करून असते.

मेट्रोचा प्रश्न

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी भूमिगत ‘मेट्रो-३’ प्रकल्प गिरगाव परिसरातून जात आहे. जगन्नाथ शंकरशेठ मार्गाखालून जाणाऱ्या ‘मेट्रो-३’मुळे किती इमारतींना धोका निर्माण होणार, किती इमारती पाडाव्या लागणार, ‘मेट्रो-३’ धावू लागल्यानंतर धोकादायक इमारती पडल्या, तर त्यांचा पुनर्विकास तेथेच होणार का, असे अनेक प्रश्न गिरगावकरांना सतावत आहेत. राज्य सरकारने ‘मेट्रो-३’ प्रकल्पाआड येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन याच ठिकाणी करण्याचे आश्वासन दिले आहे; पण ‘मेट्रो-३’ सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी, फेरीवाले, टॅक्सीवाले आदींमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे काय, असा सवाल या विभागातील नागरिक विचारत आहेत.

कचऱ्याचे साम्राज्य आणि दूषित पाणी

चाळीमधील अरुंद घरगल्ल्या कचऱ्याचे आगार बनू लागल्या आहेत. पालिकेच्या कामगारांनी अथवा खासगी कामगारांनी घरगल्ल्या स्वच्छ केल्यानंतर अवघ्या १५-२० दिवसांत पुन्हा त्या कचऱ्याने भरून जातात. चाळकऱ्यांनी घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन पालिकेकडून अनेक वेळा करण्यात आले; पण चाळकऱ्यांच्या सवयी मात्र बदलत नसल्याने घरगल्ल्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यातूनच जलवाहिन्या घरोघरी पोहोचल्या असून गंजलेल्या जलवाहिन्या दूषित पाणीपुरवठय़ासाठी आमंत्रण ठरत आहेत.

आरोग्याचे प्रश्न

घरगल्ल्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे या परिसरात घुशींचा प्रचंड वावर आहे. त्याचबरोबर डासांचाही मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे काही विभागांत साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पालिकेकडून धूम्रफवारणी अथवा कीटकनाशक फवारणी करण्यात येत असली तरी आजारांना आवर घालण्यासाठी ती पुरेशी नाही.

या परिसरात काही ठिकाणी अपुऱ्या पाणीपुरवठय़ाची समस्या भेडसावत आहे. येथे घरगल्ल्यांची संख्या मोठी असल्याने अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेकडून साफसफाई करण्यात येते; परंतु रहिवाशांकडून पाहिजे तसा प्रतिसाद पालिकेला मिळत नाही. घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात येते; परंतु रहिवाशी त्याकडे दुर्लक्ष करीत घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकत आहेत. या विभागातील नगरसेवक आणि पालिका अधिकारी वेळोवेळी समस्यांचे निराकरण करण्यासाठी झटत असतात. त्याला रहिवाशांच्या सहकार्याची जोड मिळाल्यास अस्वच्छतेचा प्रश्नही निकालात निघू शकेल.

इंद्राणी मलकानी, एएलएम समन्वयक

उचाळींच्या जागी टॉवर उभे राहू लागले असून या विभागात अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पहिल्या मजल्यावरही पाण्यासाठी पंप बसविण्याची वेळ रहिवाशांवर येत आहे. बहुतांश सर्वच टॉवरमध्ये अधिक क्षमतेच्या पंपाने पाणी खेचले जात असून त्यामुळे आसपासच्या चाळींना अपुरे पाणी मिळू लागले आहे. परिणामी चाळकऱ्यांमध्ये टॉवरवासीयांबाबत रोष निर्माण होऊ लागला आहे. पालिकेने या समस्येकडे काळजीपूर्वक लक्ष न दिल्यास भविष्यात पाण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सागर बिवलकर, रहिवाशी, गिरगाव

धूम्रफवारणी, कीटकनाशक फवारणी करण्यात येत असली तरी डासांच्या प्रादुर्भावावर पालिकेला नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळेच डेंग्यू, हिवतापापाठोपाठ आता या परिसरात चिकनगुनियाची साथ पसरू लागली आहे. ग्रॅन्ट रोडमधील मंडईत नियमितपणे सफाई होत नसल्याने मासळी, भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे आसपासच्या रहिवाशांना दरुगधीचा त्रास सहन करावा लागत असून आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती रहिवाशी व्यक्त करीत आहेत.

छाया भांडे, समाजसेविका, ग्रॅन्ट रोड