रस्त्यावर उतरण्याचा मनसेचा इशारा

पालिकेबरोबर कोणताही करार न करता अनेक ठिकाणची मैदाने आणि उद्यानांवर राजकीय नेत्यांनी कब्जा केला असून पालिका दरबारी त्याची नोंदच नाही, असा गौप्यस्फोट मनसेने बुधवारी केला. पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून नेत्यांच्या कब्जातील मैदाने तात्काळ ताब्यात घ्यावी अन्यथा मनसेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मुंबईमधील संस्था, संघटना, शाळा आदींना दिलेली २३५ मैदाने पालिकेने ताब्यात घ्यावीत, असे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानांच्या दत्तक विधानाला स्थगिती दिली आहे. त्यानुसार पालिका आयुक्तांनी २१६ मैदाने ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र याव्यतिरिक्त मुंबईतील अनेक मैदाने आणि उद्याने राजकीय नेत्यांनी अनधिकृतपणे कब्जा केला आहे. पालिकेबरोबर करार न करताच या मैदानांवर बांधकामेही करण्यात आली आहेत. त्याची पालिका दरबारी नोंदच नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

राजकीय नेत्यांनी कब्जात घेतलेल्या या मैदानांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत असून मोठय़ा थाटामाटात विवाह सोहळे आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

पण पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील अधिकाऱ्यांचे या मैदानांकडे लक्ष नाही. पालिकेच्या विभाग कार्यालयांतील सर्व मैदाने आणि उद्यानांची अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. कराराशिवाय बांधकामे केली असतील तर ती जमीनदोस्त करावी आणि संबंधित नेत्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

पालिका आयुक्तांनी तात्काळ आदेश देऊन ही मैदाने राजकीय नेत्यांच्या कचाटय़ातून सोडवावी अन्यथा मनसेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.