केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेकरिता शहरांची निवड करताना सत्ताधारी भाजपने राजकारण आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मराठवाडय़ातील नांदेड किंवा लातूरचा यादीत समावेश का करण्यात आला नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
राज्यातील दहा शहरांची निवड करताना मराठवाडय़ातील फक्त औरंगाबादचा समावेश करण्यात आला. पण त्याच वेळी नांदेड, लातूर अथवा परभणी या शहरांचा विचार झाला नाही. कारण या महापालिकांमध्ये काँग्रेस वा राष्ट्रवादीची सत्ता असल्यानेच या महापालिकांना डावलण्यात आल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी केला आहे. लातूरमध्ये भाजपचा खासदार निवडून आला, पण या खासदाराचे प्रयत्न कमी पडलेले दिसतात. तसेच नांदेड आणि परभणीमधील भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना राज्याच्या सत्तेतील नेते किंमत देत नाहीत हेच स्पष्ट झाल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. दहा शहरांची निवड करताना काँग्रेसची सत्ता असलेल्या सोलापूर शहराचा समावेश करण्यात आला आहे.