उर्वरीत ‘पाहुण्यां’वर जीवनसत्त्वे, मानसिक स्वास्थ्यासाठी औषधांचा मारा

भायखळ्याच्या उद्यानातील एका पेंग्विनच्या मृत्यूनंतर निर्माण झालेले राजकीय वादळ आणखी तीव्र होऊ नये, याकरिता आता प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या ठिकाणी उरलेल्या सात पेंग्विनची प्रकृती व्यवस्थित राहावी, यासाठी त्यांना जीवनसत्त्वे तसेच मानसिक स्वास्थ्य सुधारणाऱ्या औषधांचे डोस देण्यात येत आहेत. दरम्यान, पेंग्विनच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या संस्थेकडून आणखी एका पेंग्विनची मागणीदेखील करण्यात आल्याचे समजते.

थायलंडहून भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात २६ जुलै रोजी आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा रविवारी मृत्यू झाला. स्थानिक वातावरणात रुळण्यासाठी या सर्व पेंग्विनना लहान क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. मृत्यू झालेल्या पेंग्विनच्या दीड वर्षांच्या पिलाला ‘ग्राम निगेटिव्ह’ या जिवाणूचा संसर्ग झाला होता. हे जिवाणू सामान्यत: शरीरात असतात. मात्र काही वेळा शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी पडल्यावर या जिवाणूंची संख्या अचानक वाढते व संबंधित पशू आजारी पडतो. तीन महिने वातावरणाशी जुळवून घेताना सर्व पेंग्विनची सर्वसामान्य काळजी घेण्यात आली असली तरी त्यांना प्रतिजैविके देण्यात आली नव्हती, असे स्पष्ट झाले आहे.

पेंग्विन हा प्राणी कळपाने राहतो व त्यांच्यामध्ये समूहभावना प्रबळ असते. त्यामुळे या कळपातील अवघ्या दीड वर्षांची मादी पेंग्विन आठवडाभर आजारी पडून तिचा मृत्यू झाल्याने इतरांवर त्याचा ताण येण्याची शक्यता आहे. तसेच या मादी पेंग्विनला यकृतात संसर्ग झाला होता. त्यामुळे रविवारी तिचा मृत्यू झाल्यानंतर इतर सात पेंग्विनच्या आरोग्यसेवेबाबत अधिक काळजी घेण्यात येत आहे. या पेंग्विनना जीवनसत्त्वांच्या (मल्टिव्हिटॅमिन्स) गोळ्या देण्यात येत असून त्यांची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी औषधे सुरू करण्यात आली आहेत. आपल्याच कळपातील एकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर येऊ शकत असलेला ताण घालवण्यासाठीही उपचार सुरू केले आहेत, असे भायखळा प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

भायखळा येथील उद्यानात प्राण्यांची काळजी घेतली जात नाही. दुर्लक्ष केल्यानेच पेंग्विनचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करून उर्वरित सात पेंग्विनना परत पाठवले जावे, अशी मागणी प्लाण्ट अ‍ॅण्ड एनिमल वेल्फेअर सोसायटीने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे केली आहे. त्याचसोबत भायखळा पोलीस ठाण्यातही या संस्थेने प्राणिसंग्रहालयाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पत्र दिले.

प्राण्यांमधील ताणतणाव

मनुष्याप्रमाणेच प्राण्यांमध्ये सहचराच्या मृत्यूचा अथवा दुराव्याचा मानसिक परिणाम जाणवतो. याआधी २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यावेळी प्रमुख भूमिका बजावलेल्या टायगर या कुत्र्याचा २२ जुलै रोजी मृत्यू झाल्यावर त्याचा सोबत असलेल्या सीझर या कुत्र्यावर ताण आल्याचे निष्पन्न झाले होते. सीझर या कुत्र्याचाही १३ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. हीच बाब भायखळय़ातील प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या पेंग्विनच्या बाबतीत घडू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पालिकेने दुसरा पेंग्विन मागवला

पेंग्विनच्या खरेदीसोबतच त्यांच्या पाच वर्षे देखभालीचा करारही पालिकेने थायलंडमधील कंपनीसोबत केला आहे. पेंग्विन मुंबईतील वातावरणाशी जुळेपर्यंत पहिल्या तीन महिन्यांच्या देखभालीचा वेगळा करार थायलंड येथील गोवा ट्रेड फार्मिग लिमिटेड या कंपनीशी करण्यात आला. कराराची पूर्तता होण्यात काही दिवस बाकी असताना एक पेंग्विन दगावल्याने प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. त्रिपाठी यांनी या कंपनीला सोमवारी पत्र लिहून कराराचे उल्लंघन झाल्याचा तसेच दुसरा पेंग्विन पर्याय म्हणून देण्यास सांगितले आहे.