महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विमानतळानजीकच्या पुतळ्यासमोर ‘सामना’ रंगणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानजीकच्या पुतळ्यासमोर शिवसेना-भाजप आमनेसामने येणार आहेत. छत्रपतींचे गडकिल्ले आणि महाराष्ट्र महती सांगणारा देखावा व विद्युत रोषणाई भाजप करणार आहे. तर शिवसेनेकडून संयुक्त महाराष्ट्राचा देखावा उभारून अखंड महाराष्ट्राला शिवरायांचा आशीर्वाद असल्याचे दृश्य साकारले जाणार आहे. सजावटीसाठी आधीपासूनच दोन्ही पक्षांनी पुतळ्यानजीकच्या जागेवर दावा केल्याने महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाआधीच उभयपक्षी ‘सामना’ रंगणार आहे.

विमानतळाचे नूतनीकरण सुरू असताना शिवरायांचा पुतळा आच्छादित करण्यात आला होता. शिवसेना आमदार अनिल परब यांनी काही महिन्यांपूर्वी पुतळ्यावरील आच्छादन दूर करून त्यावर अभिषेक व पूजा केली आणि पुतळ्याचे अनावरण केले होते. महापालिका निवडणुका लक्षात घेता शिवसेना व भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भाजपनेही शक्तिप्रदर्शन आणि आठवडाभर घरोघरी जाऊन प्रचार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवसेनेआधीच ही जागा काबीज करण्यासाठी भाजपने ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच कार्यक्रम आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, भाजप खासदार, आमदार त्याला उपस्थित राहतील. भव्य देखावा, रोषणाई व सजावट करण्यात येईल आणि ते काम भाजपने सुरूही केले आहे.

शिवसेनेनेही १ मे रोजी सकाळी १० पासून शिवरायांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यास उपस्थित राहणार आहेत. भाजपकडून स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा दिला जात आहे आणि राज्याचे विभाजन करण्याची भूमिका घेतली जात आहे. राज्याचे तुकडे करण्यास शिवसेनेचा कडाडून विरोध असून अखंड महाराष्ट्रालाच छत्रपतींचा आशीर्वाद असल्याने संयुक्त महाराष्ट्राचा देखावा तेथे मांडला जाईल, असे अनिल परब यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर १ मे रोजी कार्यक्रम करणार असल्याचे पत्र जीव्हीके कंपनीकडे काही दिवसांपूर्वीच पाठविले असून सजावट व अन्य तयारीसाठी आधीपासूनच जागा लागेल. आम्ही परवानगी मागत नाही, कंपनीला माहिती दिली आहे. आमचा कार्यक्रम नियोजनानुसार पुतळ्यासमोरच होईल. त्याआड कोणी आलेच तर योग्य तो निर्णय घेऊ. पण मागे हटणार नाही.

– अनिल परब, आमदार, शिवसेना

आम्ही जीव्हीके कंपनीला पत्र पाठवून ३० एप्रिल व एक मे रोजी आधीच जागा मागितली आहे. आमचा कार्यक्रम ठरल्यानुसार ३० एप्रिलला रात्री होईल. सजावटीचे काम सुरूही करण्यात आले आहे. तो देखावा १ मे रोजी कायम राहील. दोन्ही कार्यक्रम होत असतील, तर शिवसेनेच्या कार्यक्रमाला आमची हरकत नाही.

– अ‍ॅड. आशीष शेलार, अध्यक्ष मुंबई भाजप

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics playing by using shivaji maharaj statue
First published on: 27-04-2016 at 04:58 IST