कुलाबा वगळता मुंबईत इतरत्र हवेची स्थिती खराब

फटाक्यांच्या धुराने दिवाळीत श्वसनकोंडी होण्याचे प्रकार दरवर्षीचेच. मात्र दिवाळीआधीच मुंबईकरांना श्वास कोंडल्याचा अनुभव येऊ लागला आहे. त्यासाठी मुंबईतील बांधकामे व वाहने जबाबदार ठरत आहेत. सफर प्रकल्पांतर्गत शहरातील नऊ विभागांतील कुलाबा वगळता इतर आठ ठिकाणची हवा कमी-अधिक प्रमाणात प्रदूषित आहे. आज, रविवारी मालाड, भांडुप, अंधेरी व चेंबूर येथील हवा खराब राहील, असा अंदाज आहे.
भूविज्ञान मंत्रालय आणि भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने मुंबईत सफर प्रकल्पांतर्गत बोरिवली, मालाड, भांडुप, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, वरळी, माझगाव आणि कुलाबा या नऊ ठिकाणी हवेची प्रतवारी मोजणारी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. दरदिवशी या ठिकाणच्या हवेच्या प्रतवारीची नोंद केली जाते. त्यात धूलिकण, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड्स, कार्बन मोनॉक्साइड आणि ओझोनचे प्रमाण मोजून हवेची शुद्धता तपासली जाते. प्रदूषकांच्या मापनावरून हवेची उत्तम, मध्यम, खराब, अत्यंत खराब आणि धोकादायक अशी प्रतवारी केली जाते. दरम्यान, रविवारी दिवाळीनिमित्त रस्त्यावर उतरणारी भरपूर वाहने व त्यानंतर फटाक्यांचा धूमधडाका यामुळे हवेची प्रतवारी आणखी घसरण्याची शक्यता आहे.

समाधानकारक हवा येथे..
’बोरिवली, वांद्रे कुर्ला संकुल, वरळी, माझगाव कुलाब्यातील हवा उत्तम’भरपूर झाडे व त्यामानाने कमी रहदारी तसेच बांधकामे सुरू नसल्याने कुलाबा येथील हवा उत्तम असल्याचे अहवालात म्हटले आहे.