चेंबूरमधील आरसीएफ परिसरात असलेल्या तलावात महापालिकेने चक्क सांडपाणी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या सांडपाण्यामुळे संपूर्ण तलाव दूषित होऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची भावना असून संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

चेंबूरमध्ये गणपती आणि गौरी विसर्जनासाठी आशीष टॉकीज परिसरात हा एकमेव तलाव आहे. या तलावामध्ये वाशी नाका, चेंबूर कॉलनी, वाशी गाव आणि संपूर्ण आरसीएफ परिसरातील गणपतींचे विसर्जन होते, शिवाय इतर अनेक धार्मिक कार्य या ठिकाणी रोजच होत असतात. हा तलावाचा ताबा आरसीएफ कंपनीकडे आहे, मात्र गणेश विसर्जन दरम्यान या तलावाची देखभाल पालिकाच करते. त्यानंतर वर्षभर या तलावाकडे आरसीएफ कंपनी किवा पालिका ढुंकूनही पाहात नाही. त्यामुळे सध्या या तलावाची खूपच दुरवस्था झाली आहे.

तलावाच्या सर्वच भिंती भग्नावस्थेत आहेत. त्यातच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आरसीएफ वसाहत येथून येणारे सांडपाणी पालिका मुख्य नाल्यात न सोडता या तलावामध्ये सोडत आहे. त्यामुळे या तलावाचे पाणी दूषित झाले असून परिसरात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे. गणपती विसर्जनानंतर तलाव अधिकच प्रदूषित झाला. अनेक रासायनिक द्रव्ये मिसळली जात असल्याने तलावातील मासे आणि इतर जीव-जंतू आदी जैववैविध्याला धोका निर्माण झाला आहे. आता हे सांडपाणीही पाण्यामध्ये मिसळू लागल्याने परिसरातील रहिवाशांना या तलावाजवळून जाताना अक्षरश: नाकाला रुमाल लावावा लागतो. याबाबत पालिकेच्या एम पूर्व विभागाचे साहाय्यक आयक्त श्रीनिवास किलजे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

एकीकडे संपूर्ण देशात स्वच्छता अभियान सुरू आहे. असे असताना चेंबूरच्या या आरसीएफ तलावामध्ये मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. ज्या तलावात गौरी-गणपतीचे विसर्जन होते, त्याच तलावात ही सांडपाण्याची वाहिनी सोडण्यात आली आहे. याची संपूर्ण माहिती पालिका अधिकारी, नगरसेवक आणि आमदारांना आहे. मात्र त्यांच्याकडून या ठिकाणी पूर्णपणे कानाडोळा करण्यात येत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे

हा तलाव आरसीएफच्या मालकीचा असला, तरी त्याचे व्यवस्थापन व सुशोभीकरण पालिकेकडूनच करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शिवाय सांडपाण्याबाबत मी पाहणी करणार असून यावर योग्य तोडगा काढण्यात येईल.

– अंजली नाईक, नगरसेविका