मराठीतील अशा प्रकारचा पहिलाच ग्रंथ
रामदास भटकळ आणि मृदुला प्रभुराम जोशी यांनी लिहिलेल्या ‘पॉप्युलर रीतिपुस्तक’ या ग्रंथाला पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘शरद्चंद्र मनोहर भालेराव लक्षवेधी साहित्य ग्रंथ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. अशा प्रकारचा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ आहे.
इंग्रजीत अशा विषयावरील ग्रंथ नियमित प्रकाशित होत असतात. इंग्रजीत त्याला ‘मॅन्युअल ऑफ स्टाइल’ किंवा ‘स्टाइलबुक’ असे म्हटले जाते.
पुस्तकाची निर्मिती होत असताना लेखकाने लिहिलेल्या हस्तलिखितापासून ते पुस्तक छापून प्रकाशित होईपर्यंत काय काळजी घ्यायची याबाबत लेखक, प्रकाशक, संपादक, मुद्रितशोधक, मुद्रक यांना या ग्रंथात मार्गदर्शन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रकाशनाबाबत मराठीत अशा प्रकारची माहिती आणि मार्गदर्शन करणारे हे पहिलेच पुस्तक आहे.
गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या काळा घोडा महोत्सवात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले होते. जाणकार व चोखंदळ साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांकडून या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराने आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या २६ मे रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सायंकाळी साडेपाच वाजता एस.एम. जोशी फाऊंडेशन सभागृह, नवी पेठ, पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू हे प्रमुख पाहुणे, तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.