प्रशासनाच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा होत नसल्याने आणि सनदी अधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलहही चव्हाटय़ावर येऊ लागल्याने एकूणच त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये प्रशासनात घाऊक खांदेपालट करण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयापासून या बदलाला सुरूवात होणार असून आपल्या विश्वासातील अधिकाऱ्यांची महत्वाच्या पदांवर वर्णी लावून कारभार गतीमान करण्याचा मुख्यमंत्र्याचा इरादा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या अनेक निर्णयांची अंमलबजावणी रखडलेली आहे. चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने सरकारच्या कारभाराची छाप जनतेवर पडत नसल्याने मंत्र्यांबरोबरच खुद्द मुख्यमंत्र्यांनीही अनेकवेळा उघड नाराजी व्यक्त केली आहे. सनदी अधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत असून गेल्याच आठवडय़ात निवृत्तीच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याची टीका होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासनात मोठय़ाप्रमाणात फेरबदल करून चांगल्या अधिकाऱ्यांची महत्वाच्या पदांवर वर्णी लावण्याबरोबरच काही अधिकाऱ्यांना बाजूला करण्यात येणार असल्याचे समजते.
प्रशासकीय खांदेपालटाला मुख्यमंत्री आपल्या कार्यालयापासून सुरूवात करण्याच्या विचारात असून एका विश्वासू सचिवाला तेथून हलविले जाणार आहे. मात्र या अधिकाऱ्याची महत्वाच्या अशा महसूल विभागात वर्णी लागण्याची चर्चा मंत्रालयात ऐकावयास मिळत आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांची मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वर्णी लागण्याचे निश्चित मानले जात असून वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव आणि कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन हे दोन्ही ज्येष्ठ अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या महत्वाच्या विभागांमध्ये आपली वर्णी लावण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भुषण गगराणी यांची सिडको किंवा एमएमआरडीएमध्ये, राधेशाम मोपलवार किंवा राजेश कुमार यांची सार्वजनिक बांधकाम विभागात, प्रभाकर देशमुख यांची कृषी विभागात, यु.पी.एस. मदान यांची वित्त विभागात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.