निकालाच्या विलंबामुळे प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याची नामुष्की

मुंबई विद्यापीठाच्या लांबलेल्या निकालामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. विद्यापीठातील सर्व शाखांचे विभाग, संलग्न असलेली महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठाने सोमवारी जाहीर केले आहे. रखडलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, तेव्हा प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी अनेक विद्यार्थी संघटनांनी केली होती.

विद्यापीठाचे कला, विज्ञान शाखेचे निकाल जाहीर असले, तरी बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. नामांकित महाविद्यालयांचे आणि विद्यापीठातील विविध विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट होती. त्यामुळे महाविद्यालयांनी प्रवेश अर्ज स्वीकारणे सोमवारपासून बंद केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांमुळे एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिले होते.

तसेच प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते. या घटनेला तीन दिवस उलटले तरी विद्यापीठाकडून मात्र कोणतीच हालचाल झालेली नाही. निकाल राखीव असल्याने अनेक विद्यार्थी विद्यापीठामध्ये गेले काही दिवस हेलपाटे घालत आहेत. मात्र त्यांना ‘दोन दिवसांनी या’ असेच दरवेळेस ऐकायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दारे बंद झाली तर आम्ही काय करायचे, असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलेला आहे. ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे परिपत्रकाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. विद्यापीठातील सर्व शाखांचे विभाग, संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे.

युवा सेनेचे ठिय्या आंदोलन

विद्यापीठाने प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याचे परिपत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांनी सोमवारी विद्यापीठाकडे केली होती. यावेळी विद्यापीठाचे कोणतेच प्रभारी पदाधिकारी विद्यापीठात उपलब्ध नसल्याने आम्हाला हे परिपत्रक जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे मदत केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. तेव्हा आपली मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांसह युवा सेनेने विद्यापीठामध्ये ठिय्या आंदोलन केले. तसेच विज्ञान शाखेतील ३ विद्यार्थिनींचा निकाल राखीव ठेवला असल्याने निकाल मिळवण्यासाठी मागील पंधरा दिवस त्या हेलपाटे घालत आहेत. युवा सेनेच्या मागणीवरून या विद्यार्थिनींना त्यांच्या गुणपत्रिका मिळाल्या आहेत.

आणखी १२ निकाल जाहीर

सोमवारी विद्यापीठात ८१६१ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि नियमन पूर्ण झाले आहे. या कामासाठी सोमवारी ५१८ प्राध्यापकांनी कॅप सेंटरमध्ये उपस्थिती लावली होती. सोमवारी बारा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत.