डेंग्यू, मलेरिय प्रतिबंध मोहिमेत जनजागृतीसाठी पालिकेने ९० लाख रुपयांची छापून घेतलेली भित्तिपत्रके कुठेच नजरेला पडत नसल्याचा आरोप स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी प्रशासनावर केला. पालिकेचा छपाईखाना असतानाही बाहेरून चढय़ा किमतीने पोस्टर विकत घेतली गेल्याचा आरोपही स्थायी समितीत करण्यात आला.
डेंग्यू, मलेरिया पसरवण्यास कारणीभूत ठरत असलेल्या डासांच्या उत्पत्तीला आळा बसावा यासाठी पालिकेकडून जनजागृती मोहीम दरवर्षी हाती घेण्यात येते. गृहनिर्माण संस्थांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या भित्तिपत्रकांचा यात समावेश असतो. या भित्तिपत्रकांसाठी पालिकेकडून ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले. पावसाळा संपल्यावर डेंग्यूची साथ मोठय़ा प्रमाणावर वाढली तेव्हा पुन्हा एकदा ४० लाख रुपयांची पत्रके छापण्याचे कंत्राट देण्यात आले. पालिकेचा छपाई कारखाना असतानाही प्रत्येकी २० रुपये दराने दोन लाख पत्रके छापण्यासाठी बाहेरच्या संस्थेला का देण्यात आली, असा प्रश्न मनसेचे गटनेता संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. ९० लाख रुपये खर्च करून छापण्यात आलेली ही पत्रके फारशी दिसतही नाहीत, मग ही पत्रके नेमकी कुठे गेली, या संदीप देशपांडे यांच्या आरोपाचे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनीही समर्थन केले. भित्तिपत्रके चिकटवण्यासाठी मागे चिकटपट्टी लावण्याची सोय पालिकेच्या छपाईखान्यात नसल्याने हे काम बाहेर दिल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांनी सांगितले.

मुंबईत डेंग्यूचे आणखी तीन बळी
मुंबई : पालिकेकडून डेंग्यू मृत्यूची आकडेवारी उघडपणे सांगितली जात नसताना बुधवारी आणखी तीन जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घाटकोपर येथील आशीर्वाद रुग्णालयात ३१ ऑक्टोबर रोजी एका महिलेचा, उत्तर प्रदेशहून आलेल्या १६ वर्षांच्या मुलीचा मंगळवारी केईएम रुग्णालयात तर वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात बुधवारी एका तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. डेंग्यू मृत्यूंची अधिकृत संख्या दहा असून संशयित मृत्यूंची संख्या तीनवरून पाचवर गेली आहे. केईएममधील मुलीचा मृत्यू मुंबईत गणला जाणार नाही.