घोडबंदर येथील नागला बंदर परिसरात सोमवारी रात्री रस्त्यावरील खड्डा चुकविताना रिक्षा दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक मोहमद जुनेद जलील शेख (३२) याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी रस्त्यावर खड्डा खोदणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंब्रा-कौसा भागातील अमृतनगर मार्केट परिसरात मोहमद शेख राहत होते. सोमवारी रात्री ते मीरा रोड येथे एका प्रवाशाला सोडून घरी परतत होते. दरम्यान, घोडबंदर मार्गावरील नागला बंदर परिसरात रस्त्यावरील खड्डा चुकवीत असताना त्यांची रिक्षा दुभाजकावर धडकली. जखमी अवस्थेत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
नागला बंदर परिसरात रस्त्याचे काम सुरू असून तेथे पेव्हर ब्लॉग बसविण्यात येत आहेत. ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध पेव्हर ब्लॉग बसविलेले नसल्यामुळे तेथे खड्डा आहे. या खड्डय़ामुळे अपघात होऊ नयेत, यासाठी ठेकेदाराने सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे या प्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.