‘खड्डय़ात गेले रस्ते’ म्हणत खड्डय़ांपासून स्वत:ला वाचवत नित्य प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी पालिकेला आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी या खड्डय़ांनाच रांगोळीचा साज चढवला आहे. रशियातील नागरिकांनी खड्डेमुक्तीसाठी राबवलेल्या अभिनव उपक्रमापासून प्रेरणा घेत ‘साहस’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण शहरभर पडलेल्या खड्डय़ांभोवती रांगोळी काढली आहे.

खड्डय़ांभोवती रांगोळी काढल्याने तरी पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक यांचे लक्ष वेधले जाईल. या खड्डय़ांभोवती रांगोळी काढली असल्याने तरी पालिकेला सहजपणे हे खड्डे दिसतील, अशी किमान अपेक्षा व्यक्त करतानाच आम्ही जो कर भरतो त्याबदल्यात आम्हाला मूलभूत नागरी सोयी-सुविधा तरी व्यवस्थित मिळाव्यात एवढीच आपली मागणी असल्याचे ‘साहस’चे अध्यक्ष सय्यद अहमद यांनी सांगितले.