११ हजार मेट्रिक टन डांबरमिश्रित खड्डी वापर

पावसाळ्यापूर्वी आणि  पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी वरळी येथील पालिकेच्या डांबरमिश्रित खडी निर्मितीच्या प्रकल्पातून गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल ११ हजार मेट्रीक टन डांबरमिश्रित खडीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र मुंबईत आजही ठिकठिकाणचे रस्ते खड्डय़ांत गेले आहेत. त्यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयांना पुरविण्यात आलेली डांबरमिश्रित खडी नक्की वापरली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्तेनिर्मिती आणि खड्डे बुजविण्यासाठी लागणारी डांबरमिश्रित खडी वरळी येथील पालिकेच्या प्रकल्पामध्ये तयार केली जाते. डांबरमिश्रित खडीसाठी लागणारी खडी खासगी कंत्राटदाराकडून, तर डांबर सरकारी कंपन्यांकडून खरेदी करण्यात येते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पालिकेच्या विभाग कार्यालयांकडून हाती घेण्यात आले होते. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केली असून पावसाच्या तडाख्यात पडणारे खड्डे बुजविण्याचे कामही कंत्राटदारांवर सोपविण्यात आले आहे. खड्डे बुजविण्यासाठी लागणारी डांबरमिश्रित खडी कंत्राटदार खासगी प्रकल्पांतून घेत आहे.

कंत्राटदारांबरोबरच खड्डे बुजविण्याचे काम पालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फतही करण्यात येत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्या प्रकल्पातून मागणीनुसार तब्बल ११ हजार मेट्रिक टन डांबरमिश्रित खडीचा विभाग कार्यालयांना पुरवठा केला आहे. या चार महिन्यात अंधेरी (पू.), जोगेश्वरी (पू.) (के-पूर्व) परिसरातील खड्डे बुजविण्यासाठी तब्बल ७११ मेट्रिक टन डांबरमिश्रित खडीचा वापर पालिकेच्या के-पूर्व विभाग कार्यालयाकडून करण्यात आला.

त्याशिवाय कंत्राटदाराने या परिसरातील खड्डे बुजविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर डांबरमिश्रित खडीचा वापर केल्याचे समजते. त्याखालोखाल गोवंडी, अणुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्दमधील खड्डे बुजविण्यासाठी विभाग कार्यालयाने ५२९.३८ मे टन डांबरमिश्रित खडीचा वापर केल्याचे आढळून आले आहे. तर एच-पूर्व विभागाकडून केवळ ५०.७१ मेट्रिक टन डांबरमिश्रित खडीची मागणी करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत कमी खड्डे पडल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र असे असले तरी दुसरीकडे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या प्रकल्पातून इतक्या मोठय़ा प्रमाणावर डांबरमिश्रित खडीचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर कंत्राटदारांनीही खासगी प्रकल्पांतून डांबरमिश्रित खडी मागवून खड्डे भरले आहेत. तरीही मुंबईतील रस्त्ये खड्डय़ातच आहेत.