गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा मुंबईत मुक्काम कायम असल्याने रस्त्यांची चाळण होऊ लागली असून डांबरी व पेवरब्लॉकचे रस्ते उखडायला सुरुवात झाली आहे. मात्र महापालिकेच्या अभियंत्यांना गेल्या दहा दिवसात मुंबईत केवळ ८५१ खड्डे सापडले असून पाऊस पडत असतानाही पालिकेच्या हुशार कंत्राटदारांनी तब्बल ६३० खड्डे बुजविल्याची नोंद संगणक प्रणालीवर झाली आहे. दरम्यान, पालिकेच्या विभाग कार्यालयातील अभियंते खड्डे शोधण्यासाठी फारशी तसदी घेत नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे.
पालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे आता रस्त्यांची चाळण होऊ लागली आहे. महापालिकेने मुख्य चौकांमध्ये आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर बसविलेले पेवरब्लॉक वेगात धावणाऱ्या वाहनांमुळे निघू लागले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. तसेच पदपथांवरील पेवरब्लॉक उखडून खड्डे तयार झाले असून पादचाऱ्यांना त्यावरून धडपडत चालावे लागत आहे. काही डांबरी रस्त्यांवरही खड्डय़ांचे साम्राज्य वाढीस लागले आहे.
खड्डय़ांचा शोध घेऊन ते बुजविण्यासाठी पालिका संगणक प्रणालीचा वापर करीत आहे. अॅन्ड्रॉइड भ्रमणध्वनीवरून काढलेलो छायाचित्र थेट पालिकेच्या संगणक प्रणालीवर उपलब्ध होतो आणि त्यानंतर पाहणी करून तो खड्डा बुजविण्यासाठी पालिका अधिकारी कंत्राटदाराकडे सोपवितात. खड्डे शोधण्याचे आणि त्यांची छायाचित्रे काढून संगणक प्रणालीवर उपलब्ध करण्याची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयातील रस्ते खात्यातील अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र या अभियंत्यांच्या संथगती कामामुळे अद्याप मुंबईतील बहुसंख खड्डे पालिकेच्या संगणक प्रणालीवर उपलब्धच झालेले नाहीत. मग ते बुजविण्यात तरी कधी येणार, असा सवाल काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत १ जुलै रोजी पावसाने हजेरी लावली. मधले दोन-तीन दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आणि रस्त्यांची दैना उडू लागली. परंतु गेल्या दहा दिवसांमध्ये पालिकेच्या अभियंत्यांना केवळ ८५१ खड्डे सापडले. त्यापैकी ७१० खड्डय़ांच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले.