राज्यातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी केंद्राने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. केंद्रीय पातळीवर केवळ बैठकाच सुरू असून, त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही, अस आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या ‘जिंकणारच’ आणि ‘हेच का ते अच्छे दिन’ या पुस्तिकांचे प्रकाशन रविवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात झाले. त्यावेळी चव्हाण यांनी राज्याच्या वीजप्रश्नाबाबत केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘‘वीजसंकटाचे आपण कधीच राजकारण केलेले नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्याच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात काँग्रेसमुळे वा गुजरातमध्ये भाजपामुळे विजेचा प्रश्न निर्माण झालेला नसून ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून पंतप्रधानांनाही पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. मात्र केंद्र सरकारच्या पातळीवर केवळ बैठकाच सुरू असून अजून कोणताही तोडगा निघालेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या १०० दिवसांत केंद्राला काहीच करता आलेले नाही त्यामुळे काही तरी करतोय हे दाखविण्यासाठी सध्याच्या योजना रद्द करणे किंवा त्यांची नावे बदलण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील वीजसंकट गडद होत असतानाच त्याचे निराकरण करण्याऐवजी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या प्रश्नाचे राजकारण करत आहेत. राज्यातील ऊर्जाप्रश्नी केंद्र सरकारच्या पातळीवर केवळ बैठकाच सुरू असून कोणताही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकारच या समस्येला जबाबदार आहे, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला, तर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत चव्हाण हे केवळ या प्रश्नाचे राजकारण करत आहेत. ते या प्रश्नी गंभीर नसून त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळेच हा प्रश्नी अधिक तीव्र बनला आहे, असा प्रतिहल्ला केला.
चंद्रपूर वीज केंद्रातील पाच संच बंद
चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे कोळसा ओला झाल्याने येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील पाच संच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत. तिथे केवळ १७५ मेगावॉट वीज उत्पादन होत असून त्यामुळे राज्यात वीज तुटवडा निर्माण झाला आहे. तांत्रिक बिघाड किंवा ओला कोळसा यामुळे गेल्या दोन वर्षांत या केंद्रात ६२ टक्क्यांवर कधीही विजेचे उत्पादन झाले नाही.
राज्याशी संबधित प्रश्नांची सोडवणूक करण्यास आम्ही सक्षम आहोत. मात्र विजेचे संकट कोळसा, गॅसची टंचाई आणि न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण झाले असून त्याची सोडवणूक केंद्रानेच करायला हवी. ही समस्या वेळीच सुटली नाही तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असेल.
– पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री