प्रभादेवीतील कामगार नगरमधील रहिवाशांचे पुनर्वसन अखेर आहे त्याच ठिकाणी होणार आहे. झोपु योजनेसाठी रस्त्याची रुंदी कमी करण्याबरोबरच आरक्षणामुळे या रहिवाशांना विस्थापित व्हावे लागणार होते. परंतु रस्त्याची रुंदी कमी करण्याबरोबरच मनोरंजनाचे आरक्षण उठविण्यात आल्यामुळे या रहिवाशांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

बडय़ा विकासकांसाठी कामगारनगरमधील रस्त्याची रुंदी कमी करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. याशिवाय मनोरंजन मैदानाचे आरक्षण असल्यामुळे झोपुवासीयांना विस्थापित व्हावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. कामगार नगर क्रमांक एकमधील झोपडपट्टी रहिवाशांचे पुनर्वसन साईसुंदर नगर (वरळी), गोमाता नगर (लोअर परळ) आणि नेहरू नगर (वरळी) या एकत्रित झोपु योजनेत करण्यात येणार होते. आपले हक्काचे घर जाणार आणि झोपु योजनेत कुठे घर मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे रहिवाशांनी एकत्र येऊन प्रभादेवी विकास कृती समितीची स्थापना केली. अखेर या कृती समितीच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून झोपु प्राधिकरणानेही रहिवाशांना साथ देऊन आरक्षण उठविण्याबरोबर कमी केलेल्या प्रस्ताविक विकास नियोजन रस्त्याला अधिकृत मान्यता दिली आहे. नगरविकास विभागाने तशी अधिसूचना जारी केल्यामुळे या रहिवाशांना आता विस्थापित व्हावे लागणार नाही, याकडे कृती समितीचे दिग्विजय जाधव, शैलेश नल्ला आणि अ‍ॅड. मंगेश गाड यांनी लक्ष वेधले आहे.

कामगार नगर एक ते तीन या झोपु योजनेत रहिवाशांचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी व्हावे, यासाठी आता कृती समिती प्रयत्नशील आहे. प्रस्तावित रस्ता अस्तित्वात असलेल्या नाल्यावरून नेण्यात आल्यास हा प्रश्न मिटेल, असे समितीचे म्हणणे आहे. भाजप सरचिटणीस सुनील राणे यांनी या प्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे, असेही समितीने स्पष्ट केले आहे.