रोख रक्कमही सरकारकडे जमा

साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचा कित्ता महाराष्ट्रातील काही साहित्यिकांनी गिरविला असून, त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून मिळालेले पुरस्कार रोख रकमेसह परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यात कवयित्री प्रज्ञा दया पवार, लेखक व समीक्षक हरिश्चंद्र थोरात आणि संजय भास्कर जोशी यांचा समावेश आहे. दादरी घटना, राज्य घटनेच्या मूल्यांवरील घाव, संस्कृतीला जाणीवपूर्वक दिला जाणारा रंग, विचार आणि विचारवंतांची हत्या या पाश्र्वभूमीवर आपण हे पुरस्कार आणि मिळालेली रोख रक्कम परत करत असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

सरकारकडून मिळालेले सर्व पुरस्कार व मिळालेली १ लाख १३ हजार रुपयांची रक्कम परत करत असल्याचे प्रज्ञा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मुद्दा केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा, जीविताच्या सन्मानपूर्व रक्षणाचा नाही तर राज्यात शासन व्यवस्थेकडून सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या अधिकारावरील घाला तसेच राज्य घटनेच्या पायाभूत मूल्यांवर घाव घालण्याच्या निषेधार्थ आपण पुरस्कार परत करत असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे.

हरिश्चंद्र थोरात यांनी विचारांची आणि विचारवंतांची हत्या, संस्कृतीला जाणीवपूर्वक दिला जाणारा रंग, विविध क्षेत्रांत जाणवणारी असहिष्णु वृत्ती अशा अनेक गोष्टींचा निषेध म्हणून पुरस्कार परत करत असून, त्यात सन्मानचिन्ह आणि ५२ हजार रुपये या पुरस्काराच्या रकमेचाही समावेश असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांत मनात साचलेला असंतोष व्यक्त करण्याच्या उद्देशातूनच राज्य सरकारने दिलेला पुरस्कार परत केला असल्याचे प्रसिद्ध लेखक संजय भास्कर जोशी यांनी सांगितले. पुरस्कार परत करणे ही पहिली पायरी आहे. एका अर्थाने हा समाज आणि सरकारला दिलेला इशारा आहे. पुरस्कार परत केला म्हणजे सगळं संपलं असं नाही. तर, समाजामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे लेखक म्हणून असलेले काम करतच राहणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.

पद्मश्री परत

चंदीगढ : सुप्रसिद्ध पंजाबी लेखिका दलीपकौर तिवाना यांनी पद्मश्री किताब परत करण्याचा निर्णय घेतला आहे. २००४ मध्ये त्यांना हा किताब देण्यात आला होता. तिवाना यांनी शीख हत्याकांड व दादरी घटनेचा निषेध केला आहे.

कन्नड लेखक प्रा. रमाकांत तरिकेरी आणि आसामातील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार होमेन बोर्गोहेन यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे.

भारतीय भाषांतील विविध साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले असून त्या चळवळीला जोडून घेण्यासाठी  महाराष्ट्रातून पुरस्कार परत करण्यास सुरुवात करत आहे.
– प्रज्ञा पवार

 

विचारांची आणि विचारवंतांची हत्या, संस्कृतीला जाणीवपूर्वक दिला जाणारा रंग, विविध क्षेत्रांत जाणवणारी असहिष्णु वृत्ती अशा अनेक गोष्टींचा निषेध म्हणून पुरस्कार परत करत आहे.
– हरिश्चंद्र थोरात

पुरस्कार परत केला म्हणजे सगळं संपलं असं नाही. तर, समाजामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे लेखक म्हणून असलेले काम करतच राहणार आहे.
– संजय भास्कर जोशी

 

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुरस्कार परत देऊन सुटत नाही!

नवी दिल्ली : अयोग्य सामाजिक प्रकारांबाबत प्रतिक्रिया देणे सर्जनशील कलावंताचा धर्मच असला तरी तरी दिशाहीन क्रोधाने मूळ प्रश्न सुटत नाही. कलावंताची कायदा व सुव्यस्थेबद्दल तक्रार असेल तर त्यांनी त्या खात्याकडे ती करावी. पुरस्कार परत करणे हा त्यावरचा उपाय नाही, असे प्रतिपादन संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष आणि प्रख्यात गायक शेखर सेन यांनी मंगळवारी केले. सध्याच्या घटनांनी मीही व्यथित आहे, पण दिशाहीन क्रोधाला अर्थ नाही. तुमची प्रतिक्रिया साहित्य, कविता वा गीतातून तितक्याच प्रभावीपणे व्यक्त होऊ शकते, असेही ते म्हणाले. दादरी प्रकरण व देशातील सहिष्णुता लयाला जात असल्याच्या आरोपावरून माया कृष्णराव यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्कार परत केल्याबद्दल ते बोलत होते. साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या स्वायत्त संस्था आहेत. बुजूर्ग व जाणकार कलावंत पुरस्कारांची निवड करतात. त्यामुळे हे पुरस्कार तितकेच प्रतिष्ठेचे आहेत, असे ते म्हणाले.

प्रामाणिकता तपासा!

नागपूर : साहित्य पुरस्कार परत करणाऱ्यांनी त्यांची प्रामाणिकता तपासून पाहण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. दादरीच्या घटनेचा उल्लेख न करता भैय्याजी म्हणाले, या देशात या आधीही अशा घटना घडल्या आहेत. तेव्हा तर कोणीच पुरस्कार परत केले नाहीत. आता विनाकारण वातावरण बिघडवले जात आहे. या मागे राजकारण असले तरी आम्ही मात्र देशाचे सामाजिक वातावरण बिघडवू देणार नाही, असेही भैय्याजी म्हणाले.