विधान परिषदेसाठी नारायण राणे यांचे नाव चर्चेत
राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीला झुकते माप देण्यास विरोध केला असला तरी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधल्यावर राष्ट्रवादीला दोन जागांवर पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये विचार सुरू झाला.
अलीकडेच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेसमध्ये मित्र पक्षांना सांभाळण्यावर भर देण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला दोन जागांवर पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका मांडल्यावर काँग्रेसमध्ये तसा मतप्रवाह होता.
राहुल गांधी यांची भूमिका लक्षात घेऊन राष्ट्रवादीने दुसऱ्या जागेकरिता अन्य पक्षांशी बोलणी सुरू केली.
शेकापची मदत
शेकापच्या तिघांनी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला व सूचक म्हणून स्वाक्षऱ्याही दिल्या. प्रफुल्ल पटेल यांनी सोनिया गांधी व अहमद पटेल यांच्याशी चर्चा केल्यावर चक्रे फिरू लागली. परदेश दौऱ्यावरून परतल्यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणुकीच्या डावपेचात शुक्रवारी लक्ष घातले. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीबाबत जास्त ताणून धरू नये, अशी भूमिका घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकच उमेदवार उभा करावा, असे मत मांडले आहे.

नारायण राणे यांच्यासाठी एक गट आग्रही
राज्यसभेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोनिया गांधी यांनी पसंती दिली आहे. तरीही अजून पक्षात दुसरा मतप्रवाह आहे. विधान परिषदेकरिता माजी मुख्यमंत्री नारायण राणे किंवा आमदार मुझ्झफर हुसेन यांच्या नावाचा विचार सुरू झाला आहे. राणे यांच्यासाठी पक्षात एक गट आग्रही आहे.