आझाद मैदानावर मुस्लिम धर्मियांचा कार्यक्रम होणार असल्याने पोलिसांच्या विनंतीनुसार खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने २८ नोव्हेंबरला दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे ठिकाण बदलण्यात आले आहे. हा मोर्चा आता चैत्यभूमीवरुन इंदू मिलपर्यंत काढण्यात येणार आहे, असे मुंबई रिपाइंचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी सांगितले. मात्र अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकशाही समितीचा मोर्चा ठरल्याप्रमाणे भायखळा येथील जिजामाता उद्यानापासूनच निघेल, असे भारिप-बहुजन महासंघाचे सरचिटणीस ज.वि.पवार यांनी जाहीर केले आहे.
राज्यात दलित, महिला व अन्य कमकुवत घटकांवर होणाऱ्या जातीय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी २८ नोव्हेंबरला जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी मुंबईत वेगवेगळे मोर्चे काढण्याचे जाहीर करण्यात आले. भारिप-बहुजन महासंघ, माकप, भापक, शेकाप, लालनिशाण पक्ष, जनता दल व अन्य पुरोगामी पक्ष-संघटनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र लोकशाही समितीने भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तर, रिपब्लिकन पक्षानेही आझाद मैदान ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. परंतु आझाद मैदानावर २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मुस्लिम समाजाच्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी ऑगस्टमध्येच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आझाद मैदान पोलिसांनी लोकशाही समिती व रिपाइंला मोर्चाची तारीख पुढे ढकलावी, अशी विनंती केली. मात्र लोकशाही समितीचा मोर्चा ठरल्या प्रमाणे त्याच तारखेला जिजामाता उद्यानापासून निघेल, असे ज. वि. पवार यांनी म्हटले आहे.