वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची न्यायालयात सारवासारव; उत्तरे देताना मात्र भंबेरी

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे अतिक्रमणे हटवण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात हस्तक्षेप करत असल्याच्या पालिकेच्या आरोपाचे सरकारने गुरुवारी न्यायालयात खंडन केले. तसेच आरोपाबाबत संशय व्यक्त केला. मात्र मेहता हे १५ एप्रिल रोजी दुपारी पोलीस ठाण्यात कशासाठी गेले होते याबाबत मौन बाळगले. त्यावर न्यायालयाने सरकारला स्पष्टीकरण देण्यास सांगितले. अन्यथा मेहतांना नोटीस बजावू असे खडसावले. अखेर सरकारने माघार घेत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मान्य केले. तसेच मेहता हे पोलीस ठाणे पाहण्यासाठी आल्याचा दावा टिळकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाने गुरूवारी न्यायालयाच्या प्रश्नांना उत्तर देताना केला. मात्र प्रश्नांची उत्तरे देताना वरिष्ठ निरीक्षकाची एवढी भंबेरी उडाली होती, की पोलीस ठाण्यात विशेषत: त्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत की नाहीत या प्रश्नाचे उत्तरही त्यांना देता आले नाही. त्यामुळे मंत्री आले होते की नाही हे सांगताना वरिष्ठ निरीक्षकाची ही अवस्था होत असेल तर ‘त्या’ दिवशी ते समोर असताना पोलिसांची काय अवस्था झाली असेल, अशी टिपण्णी न्यायालयाने केली. मेहता यांच्या भेटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रणही सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी वरिष्ठ निरीक्षक विजय खैरे हे हजर झाले. त्यांना न्यायालयाने साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावून मेहता यांच्या ‘पोलीस ठाणे भेटी’बाबत विचारणा केली. त्यावर मेहता यांनी भेट दिली होती हे खैरे यांनी मान्य केले. मात्र ते का आले होते आणि त्यांच्या भेटीची ‘स्टेशन डायरी’मध्ये नोंद का नाही, या न्यायालयाने केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मेहता हे पोलीस ठाणे पाहण्यासाठी आले होते आणि ‘स्टेशन डायरी’त त्याची नोंद करणे अनिवार्य नसल्याचा दावा खैरे यांनी केला. त्यामुळे या भेटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण सादर करता येऊ शकेल का, असे न्यायालयाकडून विचारले जाताच खैरे यांची भंबेरी उडाली. पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही आहेत का, तुमच्या दालनात सीसीटीव्ही आहेत का, याबाबत न्यायालयाकडून सतत विचारणा करूनही खैरे यांना त्यांचे उत्तर देता आले नाही. त्यांनी आपल्या कनिष्ठांकडे त्याबाबत विचारणा केली.

सीसीटीव्ही लावण्याबाबत, ते किती दिवस संग्रही ठेवण्याबाबतच्या न्यायालयाच्या आदेशाबाबतही खैरे काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. वरिष्ठ निरीक्षकाला त्याच्या पोलीस ठाण्याबाबत काहीच माहीत नसणे हे धक्कादायक असल्याचे आणि उत्तर देताना त्यांची उडालेली भंबेरी बरेच काही सांगून जात असल्याची टिपण्णी न्यायालयाने केली. त्यावर त्यांना इंग्रजीतून प्रश्न केले जात असल्याने आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात सगळ्यांची अशीच अवस्था होते, असा दावा महाधिवक्ता रोहित देव यांनी करताच न्यायालयाने खैरे यांना पुन्हा सगळे प्रश्न मराठीतून विचारले व त्यानंतरही त्यांचे वर्तन तसेच राहिल्याचा टोलाही हाणला.