दादर येथील विस्तीर्ण भूखंडावर उभारण्यात आलेल्या ‘प्रमोद महाजन थीम पार्क’चे उद्घाटन ‘लाल फिती’त अडकले आहे. महापालिकेत सुरू असलेल्या भाजप-शिवसेनेतील धुसफुशीमुळे हे उद्घाटन रखडले, की प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे आता दोन आठवडय़ांत जर महापालिकेने उद्घाटन केले नाही, तर भाजप त्यासाठी पावले टाकेल, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिला आहे.

या थीम पार्कच्या उभारणीचे काम गेली सात-आठ वर्षे सुरू होते. असंख्य प्रकारचे वृक्ष आणि शोभिवंत झाडे, फुलझाडे लावण्यात आली आहेत. लेसर शो आणि रंगीबेरंगी कारंजेही आहेत. खासगी कंपन्यांच्या सीएसआर आणि अन्य देणगीदारांकडूनही मदत मिळवून अधिकाधिक सुशोभीकरण केले जावे, हे उद्यान नागरिकांचे आकर्षण ठरावे, यासाठी प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजनही प्रयत्नशील आहेत. पण हे थीम पार्क उद्यान विभागाकडे हस्तांतरण करण्यासच विलंब झाला आहे. उद्यानाचे उद्घाटन झाल्यावर आणि हस्तांतरण झाल्यावर निधी उपलब्ध होऊन सुशोभीकरणाची कामे मार्गी लागतील. विधानसभा निवडणुकीच्या आधीच उद्घाटन व्हावे, म्हणून प्रयत्न सुरू होते. पण निवडणुकीनंतर आता पाच-सहा महिने उलटले तरी उद्घाटन होऊन हे थीम पार्क नागरिकांसाठी खुले झालेले नाही.

प्रमोद महाजन हे भाजप-शिवसेना युतीचे शिल्पकार होते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत थीम पार्कचे उद्घाटन करण्याचे प्रयत्न आहेत. राज्यात आणि महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता असूनही एका ज्येष्ठ भाजप नेत्याचे नाव असलेल्या थीम पार्कचे उद्घाटन आणि अन्य कामे का रखडली आहेत, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गेले काही दिवस महापालिकेत भाजप-शिवसेनेत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वादाची किनार असल्याने थीम पार्कच्या कामांमध्ये राजकीय कारणांमुळे खोडा घातला जात आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. प्रमोद महाजन यांचे नाव थीम पार्कला असल्याने शिवसेनेतील कोणी नेताही राजकीय कारणास्तव विरोध करणार नाही किंवा अडथळा आणणार नाही. या प्रकरणी राजकारण असल्याचा पूनम महाजन यांनी ठाम इन्कार केला. पण प्रशासकीय दिरंगाई का आहे, याचे कोडे उलगडलेले नाही, असे त्या म्हणाल्या. प्रशासकीय कोंडी फोडण्यासाठी आता मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून निर्देश देण्यासाठी भाजप नेत्यांना प्रयत्न करावे लागण्याची चिन्हे आहेत.

उद्यानाचे उद्घाटन का रखडले आहे, हे मला समजत नसून आता जर प्रशासनाने ते केले नाही, तर भाजपला त्यासाठी पावले टाकावी लागतील.
-आशीष शेलार, भाजप अध्यक्ष (मुबई)