आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राजकीय हेतू ठेवून फक्त बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत असे स्पष्टीकरण मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहेत. यासंदर्भात आशिष शेलार यांनी एक पत्रच ट्विट करून आपले स्पष्टीकरण दिले आहे. आशिष शेलार म्हणजे घोटाळ्यांचे महारथी आहेत. त्यांनी रिद्धी कंपनी स्थापन केली आहे. ती काहीही व्यवसाय करत आहे, तरीही ती इतकी पैसा कसा कमावते? हा प्रश्न प्रीती मेनन यांनी विचारला होता. तसेच सर्वेश्वर कंपनीसंदर्भातही असाच प्रकार आहे, असेही मेनन शर्मा यांनी म्हटले होते.  याप्रकरणी आशिष शेलार यांची चौकशी करण्याचीही मागणीही आपने केली होती. या सगळ्या आरोपांना आशिष शेलार यांनी पत्रक काढूनच उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पैशांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करण्यात आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात तत्परता सरकारने दाखवली. अशीच तत्परता आशिष शेलार यांच्या बाबतीत दाखवावी अशीही मागणी प्रीती मेनन शर्मा यांनी म्हटले होते. जुलै २०१६ मध्ये आशिष शेलार यांच्याविरोधात मी मनी लाँडरिंगची तक्रार केली होती. मात्र तपास यंत्रणांनी आशिष शेलार यांची चौकशी करण्यात उदासीनताच दाखवली, असेही मेनन यांनी म्हटले होते. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या घरावर छापे मारले, मग आशिष शेलार यांना अभय का दिला जाते आहे? असाही प्रश्न उपस्थित केला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान प्रीती मेनन शर्मा यांनी शेलार यांना लक्ष्य केले. हे सगळे आरोप आशिष शेलार यांनी खोडले आहेत. तसेच आपकडून शिळ्या कढीला उत आणला जातोय असा उपरोधिक टोलाही लगावला आहे.

माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भात मी याआधीच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. सर्वेश्वर आणि रिद्धी या दोन कंपन्यांच्या नावे माझ्यावर आरोप केले गेले. मात्र या कंपन्याचा राजीनामा मी कधीच दिला आहे, माझा या कंपन्यांशी काहीही संबंध नाही. अन्य कंपन्या आणि माणसांशी माझी नावे जोडण्यात आली आहेत. हा निव्वळ खोडसाळपणा आहे. माझी कोणाशीही भागिदारी नाही, मी कोणत्याही कंपनीत संचालक पदावर नाही. छगन भुजबळ यांची जी चौकशी करण्यात येते आहे, त्याच्याशी संबंधित कंपन्या आणि माझाही संबंध जोडण्यात आला आहे त्याला काहीही अर्थ नाही. असे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.