राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद हे विजयी झाले. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. विजयी घोषणाबाजी करण्यात आली. ढोल पथक आणि विजयी घोषणांचा आवाज परिसरात घुमला.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. मतमोजणीची व्यवस्था संसद भवनातील ६२ क्रमांकाच्या सभागृहात करण्यात आली होती. त्याच ठिकाणी १७ जुलै रोजी मतदान व्यवस्था करण्यात आली होती. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच रामनाथ कोविंद आघाडीवर होते. कोविंद यांनी ६५.३५ टक्के मते मिळवून प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला. मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली. कोविंद यांना ७ लाख २ हजार ६४४ तर मीरा कुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मते मिळाली. दरम्यान, कोविंद यांच्या विजयानंतर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोविंद यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं. तसंच महाराष्ट्रातील सदस्यांचेही आभार मानले. तसंच महाराष्ट्र भाजपनंही ट्विटरवरून रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, मतांच्या गणिताची जुळवाजुळव पाहता रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित होता. अपेक्षेप्रमाणेच निकाल लागला आहे. मतमोजणीची व्यवस्था संसद भवनातील ६२ क्रमांकाच्या सभागृहात करण्यात आली होती. तिथेच १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यातील जवळपास ९९ टक्के आमदार-खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला.