लहान मुलांचे अपहरण करून त्यांना अत्यंत निर्दयीपणे ठार मारणाऱ्या मृत आरोपी अंजना गावित हिच्या मुली रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यावर दोघींनीही अखेरचा प्रयत्न म्हणून मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेत फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली पण न्यायालयाने फाशीला अंतरीम स्थगिती नाकारली. उद्या, बुधवारीच दुपारी तीन वाजता या प्रकरणी सुनावणी होणार आहे. आपल्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी तब्बल आठ वर्षांचा विलंब केल्याचे कारण पुढे करीत फाशी रद्द करण्याची मागणी या दोघींनी न्यायालयाकडे केली आहे.
त्यांना लगेचच फाशी देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने न्यायालयाला कळविल्यानंतर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने गावित बहिणींच्या फाशीला अंतरीम स्थगिती देण्यास नकार दिला. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर रेणुका आणि सीमा या दोघींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. येरवडय़ामध्ये त्यांना फासावर चढविण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही केली होती. मात्र या याचिकेमुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. दया अर्ज फेटाळला असताना उच्च न्यायालयाला फाशी रद्द करून तिचे जन्मठेपेत रुपांतर करण्याचा अधिकार घटनेच्या अनुच्छेद २२६ नुसार शक्य आहे का, याची माहिती न्यायालयाने सरकारला बुधवारच्या सुनावणीत सादर करण्यास सांगितली आहे.