वन विभागाच्या हद्दीतील टेकडीवर उभारण्यात आलेली अनधिकृत झोपडी हटविण्यासाठी गेलेल्या वनरक्षकांची तिथे राहणाऱ्या पुजाऱ्याने हत्या केली. साईनगर या ठिकाणी सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली असून, रबाले एमआयडीसी पोलिसांनी अंधेरी येथून या पुजाऱ्याला अटक केली आहे.
गंगाप्रसाद गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या पुजाऱ्याचे नाव असून, त्याने साईनगरमध्ये असलेल्या टेकडीवर अनधिकृत झोपडी उभारली होती. या झोपडीभोवती असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून झाडे लावली होती. या संदर्भात ठाणे वन विभागाने त्याला झोपडी हटविण्याची सूचना केली होती. मात्र त्याला दाद देत नसल्याने वनरक्षक बुधाजी जाधव हे ही झोपडी हटविण्यासाठी या भागात आले होते. त्यामुळे संतापलेल्या गुप्ता याने धारधार शस्त्राने जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गुप्ताने तेथून पळ काढला. अधिक चौकशी केली असता गुप्ता यापूर्वी अंधेरी येथे राहत असल्याची माहिती समोर आली. त्या आधारे पोलिसांनी अंधेरी येथून त्याला अटक केली.  या झोपडीमध्ये गुप्ताने मंदिर उभारले होते. मात्र ते पाडण्यास सांगितल्याने आपण वनरक्षकाची हत्या केल्याचे त्याने सांगितले.