राज्यातील तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कोंडलेल्या कैद्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे एकटय़ा मुंबई विभागातील १० तुरुंगांमधील २५ टक्के कैद्यांना त्वचारोगाने ग्रासले आहे. ६५ कैद्यांना खरुज झाली असून उच्च रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग आणि एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्याही मोठी आहे. शिवाय मानसिक आजारांचेही १०१ रुग्ण कैदी याच तुरुंगांत असल्याचे एका ज्येष्ठ तुरुंगाधिकाऱ्याने सांगितले. कैद्यांच्या आरोग्याची ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर आता महापालिका व खासगी कं त्राटी डॉक्टरांच्या माध्यमातून नियमित तपासणी करण्याची योजना आखण्यात येत आहे.
मुंबई विभागात ठाणे, मुंबई मध्यवर्ती कारागृह, तळोजा, कल्याण, भायखळा, अलिबाग, सावंतवाडी, मुंबई महिला जिल्हा कारागृह, रत्नागिरी तसेच जे.जे. रुग्णालय कारागृह अशी १० कारागृहे असून एकूण ८९१९ पुरुष कैदी, तर ४५२ महिला कैदी या तुरुंगांमध्ये आहेत. राज्यात एकूण ५० तुरुंग असून यामध्ये गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा भोगत असलेले ८५०० कैदी आहेत. तर न्यायालयीन बंदी सुमारे २० हजार आहेत.
राज्यातील प्रत्येक मध्यवर्ती व जिल्हा रुग्णालयात एक रुग्णालय असून निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था राबविण्यात येते. तथापि या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आणि रुग्णालयातील अस्वच्छ वातावरणामुळे कैद्यांना त्वचारोग होण्याचे प्रमाण मोठे आहे. मुंबई विभागातील १० तुरुंगांमध्ये असलेल्या एकूण कैद्यांपैकी ३७६ कैदी त्वचारोगाने, तर ६५ कैदी खरुज झाल्याने त्रस्त आहेत.तुरुंगाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कैद्याला प्रतिमहिना ११३ ग्रॅम साबण पुरवला जातो.
या साबणाचा दर्जा, कैद्यांना देण्यात येणारे कपडे तसेच झोपायच्या अपुऱ्या सुविधांमुळेच, कैद्यांना त्वचारोगच नव्हे तर मानसिक आजारांनीही ग्रासले आहे, असा आरोप काही कैद्यांच्या नातेवाईकांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर केला. तुरुंगांत क्षयरोगाची लागण असलेले ६० कैदी आहेत. मानसिक आजारांचे १०१ कैदी असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे,
‘कंत्राटी पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टर नेमणार’
एकीकडे तुरुंग असुरक्षित असून कैद्यांकडे मोबाइलपासून हत्यारांपर्यंत विविध गोष्टी सहजी सापडताना दिसतात, तर दुसरीकडे गरीब कैद्यांना चांगल्या आरोग्य सुविधांअभावी आजारांचा सामना करावा लागत आहे. तुरुंगांमध्ये त्वचारोगापासून विविध आजारांचे रुग्ण असल्याची कबुली गृह विभागाचे प्रधान सचिव (तुरुंग) सतबीर सिंग यांनीही दिली. या रुग्णांना तज्ज्ञांच्या माध्यमातून उत्तम उपचार मिळावेत, यासाठी लवकरच कंत्राटी पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल, असे ते म्हणाले.