पंतप्रधानपदावर बसल्यापासून नरेंद्र मोदी शांत का आहेत, असा प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर मंगळवारी निशाणा साधला. मोदींची प्रवृत्ती हुकूमशहाचीच असल्याचा पुनरुच्चार करीत चव्हाण यांनी निकोप लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक असल्याची टीका केली. ‘पीटीआय’शी बोलताना चव्हाण यांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रहार केला.
निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जी स्वप्ने दाखविली होती. ती आता भंगली आहेत. त्यामुळेच उत्तरखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भाजपला नाकारून कॉंग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले, असे सांगून चव्हाण म्हणाले, गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींची कार्यपद्धती हुकूमशहासारखी होती. हे कॉंग्रेसला माहिती होते. त्यामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीतही हुकूमशाही येण्याचा धोका व्यक्त केला होता. आता हे सर्व लोकांसमोर आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्र्यांना कसे वागविले जाते, मंत्र्यांना किती स्वातंत्र्य दिले जाते, कोअर टीममध्ये कोण कोण मंत्री आहेत, या सगळ्यावरून हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र नव्हे, मौनेंद्र मोदी असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. मोदी यांनी परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सामाजिक विषय, समान नागरी कायदा, राम मंदिर, कलम ३७० यावर आपले मत स्पष्टपणे मांडलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी केवळ लोकांना स्वप्न दाखविण्याचे काम केल्याचे चव्हाण म्हणाले.