पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल; सरकारने पूर्णआश्वासन पाळले नसल्याची टीका

विरोधकांची संघर्ष यात्रा आणि विधिमंडळात सातत्याने केलेल्या मागणीमुळेच शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यास सरकारला भाग पडल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पण त्याच वेळी सरसकट कर्जमाफ करण्यात न आल्याबद्दल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी सरकारवर टीकाही केली आहे. ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, मग उर्वरित ४९ लाख शेतकऱ्यांचे काय, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

सुमारे ३४ हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याने त्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मिळणार असले तरी हा निर्णय आमच्यामुळेच घ्यावा लागल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. कर्जमाफी करणारच नाही अशी आधी मुख्यमंत्री फडणवीस यांची भाषा होती, पण विरोधकांची संघर्ष यात्रा, काँग्रेसने या मागणीसाठी नागपूरमध्ये काढलेला मोर्चा, विधिमंडळात सातत्याने ही मागणी लावून धरल्याने मुख्यमंत्र्यांना भूमिका बदलावी लागल्याचे अशोक चव्हाण यांचे म्हणणे आहे. सरसकट कर्जमाफी करण्याची काँग्रेसची सुरुवातीपासून मागणी होती. ९० टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्यास उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यादृष्टीने सरकारने विचार करावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. सर्व शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करण्याचा शब्द सत्ताधारी भाजपने पाळला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

सरकारने ३० जून २०१६ पर्यंतचेच कर्ज माफ केले आहे. वास्तविक गेल्या वर्षी शेतमालाचे भाव पडले होते. या कर्जमाफीतून शेतकऱ्यांना १०० टक्के दिलासा मिळणार नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ८९ लाख शेतकऱ्यांपैकी ४० लाख शेतकऱ्यांचा साताबारा कोरा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मग उर्वरित ४९ लाख शेतकऱ्यांवर अन्याय का, असा सवालही त्यांनी केला. १० हजार रुपयांच्या अग्रिम कर्जाकरिता सरकारने विविध अटी लादल्या आहेत. कर्जमाफीच्या निर्णयासाठीही जाचक अटी घातल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.

सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळेल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया माजी वित्तमंत्री आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. वित्तीय नियोजन कोलमडणार असल्याने त्याचा राज्याच्या विकासावर परिणाम होणार आहे, म्हणूनच सरकारने विशेष काळजी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

४० लाखांचा सातबारा कोरा होणार नाही – डॉ. नवले

कर्जमाफीच्या निर्णयाने ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल हा मुख्यमंत्र्यांचा दावा दिशाभूल करणारा आहे, असा आक्षेप शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचे समन्वयक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले यांनी घेतला आहे. कारण फक्त पीक कर्ज माफ करण्यात आले आहे. पीक कर्जाबरोबरच शेतीची अवजारे किंवा अन्य शेतीशी संबंधित खरेदीकरिता कर्ज घेतले जाते. हे कर्ज माफ होणार नाही. मग ४० लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार कसे, असा सवालही त्यांनी केला.