दोन महिन्यांसाठी र्निबध; वाहतूक पोलिसांच्या निर्णयाने नव्या अडचणी

मुंबईत मोठय़ा प्रमाणात धावणारी वाहने, विविध प्रकल्पांची सुरू असलेली कामे आणि त्यातच अवजड वाहनांमुळे सध्या रस्त्यावरील जागा व्यापली गेली आहे. वाहतुकीला होणारा हा अडथळा पाहता मुंबईत

येणाऱ्या खाजगी बस वाहतुकीला विशिष्ट काळासाठी  वाहतूक पोलिसांनी प्रवेशबंदी केली आहे. या निर्णयामुळे एक हजारपेक्षा जास्त खाजगी बससेवांवर परिणाम होणार असून मुंबईतून खाजगी बस पकडून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची भीती आहे. बुधवारपासून याबाबत कारवाई सुरू झाली आहे.

मुंबई वाहतुक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार मुंबईत सकाळी ७.०० ते ११.०० आणि सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत अवजड वाहन आणि सर्व प्रकारच्या खाजगी प्रवासी वाहनांना बंदी असेल. मात्र एसटी बसेस, शाळा बस, बेस्ट बस, कर्मचाऱ्यांना सोडण्याकरिता आलेल्या खाजगी कंपनीच्या बस, मुंबई दर्शनच्या बस तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.  पिण्याच्या पाण्याच्या टँकरव्यतिरिक्त अन्य पाण्याच्या टँकरना कोणत्याही प्रकारची सूट असणार नाही, असे वाहतूक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वत:च्या, भाडय़ाने घेतलेल्या किंवा पे अँड पार्कशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी रस्त्यावर पार्किंग करण्यास मनाईदेखील करण्यात आली आहे.

अवजड वाहनांवरही र्निबध घालण्यात आले असून त्यातील ४० टक्के वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत १२ सप्टेंबर रोजी अधिसूचना काढत तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. ६० दिवसांसाठीच हा नियम खाजगी बस व अवजड वाहनांसाठी लागू असेल. महत्त्वाची बाब म्हणजे या अधिसूचनेला खाजगी बस संघटनांनी आणि मालवाहतुकदार संघटनांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत राज्य सरकारकडे दाद मागण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मालवाहतुकीचा प्रश्न

मालवाहतुक  कशा पद्धतीने होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये दर महिन्याला एक लाख टन इतकी आयात होते आणि त्याची आयात करण्यासाठी तीन ते चार हजार गाडय़ांची आवश्यकता भासते. यावरही र्निबध आल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होईल, असे महाराष्ट्र ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे सरचिटणीस दयानंद नाटकर यांनी सांगितले. याव्यतिरिक्त मसजिद बंदर, क्रॉफर्ड मार्केट येथूनही मोठय़ा प्रमाणात मालवाहतूक होत असल्याचे सांगण्यात आले.

दक्षिण मुंबईत सकाळी ७.०० ते रात्री १२.०० पर्यंत

दक्षिण मुंबईत प्रवेश करण्यास आणि रस्त्यावर धावण्यास सकाळी ७.०० ते रात्री ११.०० पर्यंत अवजड वाहन आणि खाजगी प्रवासी बसना बंदी करण्यात आली आहे. मात्र रात्री १.०० ते सकाळी ७.०० पर्यंत दक्षिण मुंबईत प्रवेश करता येईल.

सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत पुढील रस्त्यांवर प्रवेश

  • पी डीमेलो रोडवरील मायलेट जक्शनपर्यंत
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील के.शांताराम पुजारे चौकपर्यंत
  • एन.एम.जोशी मार्गावरील आर्थर रोड नाक्यापर्यंत
  • डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडवरील सेन्च्युरी मिलपर्यंत
  • सेनापती बापट मार्गावरील सव्‍‌र्हिस रोडवरील एलफिन्स्टन जंक्शनपर्यंत, सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर मात्र बंदी राहील.
  • बॅ.नाथ.पै.मार्ग, रे रोड व पी डीमेलो मार्गावरून बाजूचे रस्ते वापरून दक्षिण मुंबईत जाण्यास व दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर धावण्यासाठी मनाई
  • पूर्व मुक्त मार्गावरूनही २४ तासांसाठी वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे.

खाजगी बस वाहतुकीवर घातलेल्या र्निबधांना आमचा विरोध आहे. यामुळे एक हजारपेक्षा जास्त खाजगी बसच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो. यात दक्षिण मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या जवळपास ३०० पेक्षा जास्त बसचा समावेश आहे.  – हर्ष कोटक (मुंबई बस मालक संघटना, जनरल सेकेट्ररी)

बुधवारी रात्री आठच्या सुमारास तर कांदिवली, गोरेगाव येथून कोल्हापूर, गोवा, हैद्राबाद,बेळगाम इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या १५ पेक्षा जास्त प्रवासी बस पकडण्यात आल्याचे मुंबई बस मालक संघटनेचे सहसचिव के.व्ही.शेट्टी यांनी सांगितले. दंड भरल्यानंतर या बस थोडय़ा वेळाने सोडण्यात आल्याचेही सांगितले.

काय होणार?

मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या खाजगी बससेवांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. मुंबईतील दादर, कांदिवली, बोरीवलीसह अन्य काही भागांतून मोठय़ा प्रमाणात बस बाहेरगावी जाण्यासाठी सुटतात. वाहतूक पोलिसांनी र्निबध घालून दिलेल्या वेळेत अनेक बसच्या सेवांवर गदा येऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी मुंबईबाहेरून बस पकडण्याचा पर्याय निवडावा लागेल. साधारणत: एक हजारपेक्षा जास्त खाजगी बससेवांवर परिणाम होईल.  बुधवारपासून या कारवाईचा  फटका बसण्यास सुरूवात झाली.