पूर्वीच्या काळी एखाद्या चित्रपटगृहाबाहेर दबक्या आवाजात ऐकू येणारा ‘दस का बीस’ हा आवाज सध्या विविध उपनगरांमधील खासगी बसगाडय़ा सुटण्याच्या ठिकाणांजवळ ऐकू यायला लागला आहे. कोकण रेल्वेमार्गावर सुरू असलेला गोंधळ, एकामागोमाग एक रद्द होणाऱ्या आणि दिरंगाईने पोहोचणाऱ्या गाडय़ा, फुल्ल झालेल्या एसटीच्या बसगाडय़ा यांमुळे कोकणात जाण्यासाठी आता मुंबईकरांनी खासगी बसगाडय़ांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र या गरजूंना खिंडीत पकडत खासगी बसचालक इतर वेळी ४०० ते ५०० रुपयांत उपलब्ध असलेले तिकीट दोन ते अडीच हजार रुपयांमध्ये विकत आहेत. त्यामुळे हा तिकिटांचा काळाबाजार ‘दस का बीस’ या दराने न चालता ‘दस का चालीस’ अशा चढय़ा दराने चालू आहे.
खासगी बसगाडय़ांचे अधिकृत दर कुडाळपर्यंत ४०० ते ५०० रुपये एवढे आहेत, तर वातानुकूलित बस एवढय़ाच अंतरासाठी १००० ते १२०० रुपयांपर्यंत भाडे आकारते. मात्र गणेशोत्सवाची गर्दी पाहून खासगी बसचालकांनी हे दर अवाच्या सव्वा वाढवले आहेत. साध्या बसगाडीने कुडाळपर्यंत जाण्यासाठी दीड ते दोन हजारांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत, तर वातानुकूलित गाडीसाठी हीच रक्कम अडीच ते साडेतीन हजार एवढी जास्त आहे. विशेष म्हणजे मुंबईतच प्रवाशांची ही लूट होताना वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी याकडे काणाडोळा करत आहेत.
प्रीमियम गाडी उत्तम पर्याय!
खासगी बसगाडय़ांना अवाच्या सव्वा पैसे देऊन आपला जीव संकटात टाकण्यापेक्षा प्रवाशांनी प्रीमियम गाडीचा पर्याय निवडावा, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात येत आहे. प्रीमियम गाडीचे दर एका ठरावीक कोष्टकानुसारच वाढवले जातात. तसेच हा प्रवास भरवशाचा आणि वातानुकूलित आहे. त्याशिवाय गाडीत खानपान सेवा असल्याने त्यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रीमियम गाडय़ांकडे  मोर्चा वळवणे योग्य ठरेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.