मुंबई ते नागपूर, जळगावबरोबरच महाबळेश्वर, गोव्याचे तिकीट महागले; मुंबई ते नागपूर वातानुकूलितचे तिकीट ३,७०० रुपयांपर्यंत

एप्रिल ते मे व गणपती या गर्दीच्या कालावधीत खासगी बसचे वाढत असतानाच आता दिवाळीतही हीच लूट चालवली आहे. खासगी बसचालकांकडून १३ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते नागपूरसाठी खासगी बसने जाणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित स्लिपरसाठी तब्बल ३,७०० रुपयापर्यंत किंमत मोजावी लागेल. एरवी याच मार्गावरील तिकीट दर १,२०० रुपयांपर्यंत असते. नागपूरबरोबरच औरंगाबाद, जळगाव, सोलापूर तर महाबळेश्वर आणि गोवा यांसारख्या पर्यटनस्थळांना जाण्यासाठीही वातानुकूलित व बिगरवातानुकूलित प्रवासासाठी चांगलीच रक्कम मोजावी लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खासगी बसचे तिकीट ऑनलाइन आरक्षित केल्यास यातही काही प्रमाणात वाढ दिसून येते. ही दरवाढ २३ ऑक्टोबपर्यंत लागू राहील.

गर्दीचा हंगाम सुरू झाला की खासगी बस ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे दर वाढवले जातात. गणपतीच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना तर रेल्वेचे तिकीटही मिळणे कठीण होते. त्यामुळे एसटी किंवा खासगी बसचा पर्याय निवडतात. मात्र हीच संधी साधून खासगी बस ट्रॅव्हल्सकडून तिकीट दर वाढवले जातात. अशीच पुनरावृत्ती दिवाळीच्या कालावधीतही केली जाते. दिवाळीच्या कालावधीत मुंबईतून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडय़ात जाणाऱ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असते. रेल्वेचे तिकीट मिळवताना प्रतीक्षा यादी येत असल्याने अनेक जण उन्हाळाच्या दिवसांत खासगी एसी बसचा पर्याय निवडतात. त्यामुळे प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत खासगी बस ट्रॅव्हल्सकडून तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. १३ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलेली ही वाढ दिवाळी संपेपर्यंत राहील. दादर, बोरिवली, कांदिवली, ठाणे यासह अन्य काही भागांतून खासगी बस सोडतानाच त्यांची तिकीट आरक्षित करण्याचे काऊंटरही आहेत.

या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी गेल्यास अवाच्या सवा दर आकारण्यात येत असल्याचे दिसून येते. मुंबईतून नागपूरसाठी खासगी वातानुकूलित स्लिपर बस धावतात. १५ ऑक्टोबर रोजी त्याचे दर २,७०० रुपये, तर १६ ऑक्टोबरपासून हेच दर ३,७०० रुपयांपर्यंत आकारण्यात येत आहेत. गर्दीचा हंगाम सोडल्यास तिकिटांचे दर  कमी आकारले जातात. दिवाळीत मुंबईहून औरंगाबादसाठीही वातानुकूलित स्लिपर बसमध्ये एका बाजूलाच असणारी सीट हवी असल्यास १,२०० रुपये दर तर बाजूबाजूला असणाऱ्या सीटच्या जागेचे तिकीट हवे असल्यास प्रत्येकी १००० रुपये दर आहेत. एरवी हेच दर अनुक्रमे ७०० रुपये आणि ६०० रुपये आहेत. महाबळेश्वर व गोवासारख्या पर्यटनस्थळांना जाणाऱ्या  दरातही वाढ करण्यात आली आहे. गोव्यासाठी वातानुकूलितसाठी १,५०० ते १,६०० रुपये आणि बिगरवातानुकूलितसाठी १,००० रुपये दर आहेत. मुंबई ते महाबळेश्वरसाठी १,००० रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारले जात आहेत.

  • मुंबई ते सांगली एरवी वातानुकूलित स्लीपर बसचे दर हे ७०० रुपयांपर्यंत तर बिगरवातानुकूलित आसनाचे ४०० रुपये असतात.
  • मुंबई ते गोवाचे वातानुकूलितचे एरवी दर ७०० ते ८०० रुपयांपर्यंत असतात.
  • मुंबई ते औरंगाबादचे वातानुकूलित स्लीपरचे अन्य वेळी दर हे ६०० ते ७०० रुपयांपर्यंत आहे.

गर्दीच्या कालावधीत तिकीट दर वाढवले जातात आणि त्यात काही गैर नाही. यंदाच्या दिवाळीनिमित्तही दर वाढवण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अन्य दिवशी हेच दर कमी असतात. त्या वेळी प्रवाशांना दिलासा असतोच.  – हर्ष कोटक (मुंबई बस मालक संघटना-सरचिटणीस