डॉ. राणी बंग यांची चौकशीची मागणी

गडचिरोली येथील डॉ. साळवे नर्सिग कॉलेजमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा, विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी उकळणे तसेच विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याप्रकरणी गडचिरोलीतील सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. राणी बंग यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेर पोलिसांनी याप्रकरणी वीस विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. राज्यातील अन्य काही परिचारिका महाविद्यालयांतील विद्यार्थिनींकडूनही छळणुकीच्या तक्रारी येत असून राज्यातील खासगी नर्सिग कॉलेजमधील सोयीसुविधांबाबत तसेच अतिरिक्त शुल्क घेतले जाते का आणि विद्यार्थ्यांची छळणूक होते काय याची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी डॉ. बंग यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

राज्यात मोठय़ा संख्येने परिचारिका महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली असून ‘नर्सिग कौन्सिल’च्या अखत्यारीतील या महाविद्यालयांमध्ये नियमानुसार पुरेशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. गडचिरोलीच्या चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिग कॉलेजमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे यांच्याकडून विद्यार्थिनींची लैंगिक व मानसिक छळणूक केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे सर्व विद्यार्थिनींना घेऊन डॉ. बंग गेल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

गडचिरोली येथील विद्यार्थिनींची संस्थाचालकांनी केलेली छळणूक ही भीतीदायक म्हणावी लागेल. तक्रार केल्यास तुम्हाला नापास करून शैक्षणिक नुकसान केले जाईल, अशी धमकी देत डॉ. साळवे यांनी अनेक अत्याचार केले असून उद्याच्या परिचारिकाच जर असुरक्षित वातावरणात शिकणार असतील, तर त्या चांगली सेवा कशी बजावतील?  डॉ. राणी बंग, सामाजिक कार्यकर्त्यां