ख्रिसमस आणि नववर्षांच्या स्वागतासाठी बनावट विदेशी मद्याचा पुरवठा होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत या पाटर्य़ासाठी परवाना घेतला आहे किंवा नाही तसेच या पाटर्य़ासाठी होणाऱ्या विदेशी मद्याच्या साठय़ाची तपासणी केली जाणार आहे. अलीकडेच मुंबईत झालेल्या मोठय़ा कारवाईत विदेशीच्या नावाने बनावट मद्य बाटल्यांमध्ये भरताना काहीही काळजी घेतली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामुळे प्रसंगी जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट झाल्यानेच बनावट मद्यविरोधी मोहीम अधिकच तीव्र करण्यात आली आहे.
बनावट मद्याचा साठा हस्तगत करण्याची कारवाई दर वर्षी या विभागाकडून होते. गोवा वा दमणवरून येणारा हा साठा प्रामुख्याने असतो. परंतु विदेशी मद्याच्या विक्रीतून जादा नफा होतो हे लक्षात घेऊन बनावट मद्यविक्रेते भंगारवाल्यांकडून नामांकित विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या विकत घेतात. पूर्वी साधारणत: २० ते ४० रुपयांना मिळणारी ही बाटली आता १५० ते २५० रुपयांना भंगारवाले विकू लागले आहेत. या बाटल्यांवर संबंधित कंपनीचे लेबल तसेच ठेवून फक्त बाटल्या धुवून त्यात कमी प्रतीचे मद्य भरले जाते. या बाटलीला ‘सील’ करण्यासाठी विशेष यंत्रणाही या बनावट मद्यविक्रेत्यांनी केल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि दक्षता विभागाचे संचालक प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकातील निरीक्षक मुकुंद बिलोलीकर, सुभाष जाधव, आंबेरकर आदींनी कारवाई करून चेंबूर आणि घाटकोपर पूर्व येते कारवाई करून विदेशी बनावटीच्या मद्याचा साठा हस्तगत केला. यासाठी धारावी-माहीम लिंक रोड येथील भंगारवाल्याने रिकाम्या बाटल्या पुरविल्या होत्या, असे स्पष्ट झाले आहे.
विदेश मद्याच्या विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांचा साठा, बॉटलिंगचे साहित्य, आठ ब्रँडचे २७८ छोटे खोके, १४ ब्रँडच्या ५९२ रिक्त बाटल्या असा सुमारे १९ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

भंगारमध्ये मिळालेल्या विदेशी मद्याच्या बाटल्यांमध्ये कमी प्रतीचे मद्य भरून ते विकले जात आहे. अशा प्रकारचे बनावट मद्य हे आरोग्यास घातक असते. भंगारातून घेतलेल्या या बाटल्या धुतल्याही जात नाहीत. अगदी विदेश मद्यांच्या बाटल्यांप्रमाणे ‘सील’ असलेली उपकरणेही उपलब्ध आहेत. नागरिकांनी विदेशी मद्याची खात्री करून मगच ते विकत घ्यावे
    – डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क