‘बॅटरी बॉक्स’मध्ये बिघाड; प्रवाशांना ताप
आठवडाभरात चौकशीचा अहवाल सादर होणार
लोकल गाडय़ांच्या विद्युतयंत्रणा असलेल्या डब्यांखाली असलेला बॅटरी बॉक्स पडल्याने शुक्रवारी मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. या घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र बॅटरी बॉक्स पडलेली गाडी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील ‘रेट्रोफिटेड’ गाडी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नव्याकोऱ्या बंबार्डिअर बनावटीच्या गाडय़ा नाकारून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील जुन्या गाडय़ा घेण्याची मध्य रेल्वेची योजना भविष्यात प्रवाशांसाठी किती तापदायक ठरू शकते, याची झलक शुक्रवारी पाहायला मिळाली आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे ताफ्यात येणाऱ्या नव्या बंबार्डिअर गाडय़ांपैकी एकही गाडी मध्य रेल्वेवर न घेण्याचा तुघलकी निर्णय मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी घेतला होता. या सर्व गाडय़ा पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल करून पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या सिमेन्स बनावटीच्या गाडय़ा मध्य रेल्वेवर पाठवण्याबाबतचा निर्णयही झाला होता. त्यानुसार आता पश्चिम रेल्वेवर बंबार्डिअर बनावटीच्या गाडय़ा येण्यास सुरुवात झाल्यावर पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील गाडय़ा मध्य रेल्वेवर दाखल होत आहेत.
मात्र, पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेवर सिमेन्स बनावटीची गाडी दाखल करण्याऐवजी डीसी गाडय़ांमध्ये एसी यंत्रणा बसवलेल्या ‘रेट्रोफिटेड’ गाडय़ा धाडल्या आहेत. याच गाडय़ांपैकी एका गाडीच्या विद्युतयंत्रणा असलेल्या डब्याखालील बॅटरी बॉक्स शुक्रवारी रात्री करीरोड स्थानकादरम्यान निखळून पडला. या बॉक्सला धरून ठेवणारे नटबोल्ट निघाल्याने हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.