मेट्रो कायद्यानुसार मासे वा इतर मृत प्राणी नेण्यास मज्जाव

महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मांसाहारी-शाकाहारी हा वाद पुन्हा उफाळला असून या वादाच्या पाश्र्वभूमीवर वर्सोवा मेट्रो स्थानकातून मासे घेऊन जाणाऱ्या एका प्रवाशाला सुरक्षा रक्षकांनी अडवल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र, रिलायन्स मुंबई मेट्रोवन प्रा. लि.च्या प्रवक्त्यांनी मेट्रो कायद्यातील तरतुदीकडे बोट दाखवत चर्चेला पूर्णविराम दिला. या तरतुदीनुसार देशभरात मेट्रोमधून मासे वा इतर मृत प्राणी घेऊन जाण्यावर बंदी आहे.

कोळ्यांची वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्सोवा येथे ताजे मासे घेण्यासाठी रविवारी गर्दी होते. वर्सोवा येथून अंधेरीला मेट्रोने जाण्यासाठी एक प्रवासी वर्सोवा स्थानकात मासे घेऊन आला असता त्याला सुरक्षा रक्षकांनी हटकले. सुरक्षा रक्षकांनी एक भित्तिचित्र दाखवत मेट्रोमधून मासे किंवा इतर कोणताही मृत प्राणी घेऊन जाण्यावर बंदी असल्याचे संबंधित प्रवाशाला सांगितले. समाजमाध्यमांवरून हे प्रकरण झपाटय़ाने पसरल्यानंतर आता मेट्रोमध्येही शाकाहारीकरणाचा प्रयत्न चालू झाला की काय, या चर्चेला उधाण आले होते. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सध्या मांसाहारी-शाकाहारी हा वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मतांचे ध्रुवीकरण आणि मतदारसंघांमधील गणिते सांभाळण्यासाठी सध्या या वादाला हवा दिली जात आहे.

मात्र मेट्रोमध्ये मासे किंवा इतर कोणताही मृत प्राणी नेण्यास प्रतिबंध असल्याचे मेट्रो अधिनियमात स्पष्ट म्हटल्याचे सांगत मुंबई मेट्रोवन प्रा. लि.च्या प्रवक्त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. हा कायदा देशभरातील प्रत्येक मेट्रोमध्ये लागू आहे. या कायद्यानुसार मृत प्राणी घेऊन जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा व्यवस्थेच्या पुढे जाता येतच नाही. त्यामुळे त्यांना दंड लागू करण्याचाही प्रश्न नाही, असेही प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

मांसाहारी नगरसेवकाला घर नाकारले

  • मनसेचे प्रभादेवीतील नगरसेवक संतोष धुरी यांनी गोरेगाव पश्चिम येथील श्रीधाम विकासकाच्या इमारतीत घर घेण्यासाठी त्याच्या कार्यालयात चौकशी केली.
  • या इमारतीसाठी जलतरण तलाव, क्लब असून संकुलात जैन मंदिर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही फक्त शाकाहारी लोकांनाच सदनिका देतो, असे सांगत धुरी यांना घर देण्यास संबंधित विकासकाने नकार दिला.
  • यात धार्मिक भावना दुखावल्या असून संबंधित व्यावसायिक समाजात तेढ निर्माण करत आहे, अशी तक्रार संतोष धुरी यांनी दादर पोलीस ठाण्यात केली. याबाबत संबंधित श्रीधाम ग्रुपचे नीरज मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.