मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या मेट्रो-१ प्रकल्पाने बेस्ट उपक्रमाला मात्र काही काळ संकटात टाकले होते. मुंबईकर प्रवाशांना सेवा देणाऱ्या या दोन्ही वाहतूक संस्थांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे प्रवाशांची गैरसोयही होताना दिसते. कुलाबा ते सीप्झ दरम्यान होणाऱ्या मेट्रो-३ प्रकल्पावेळी नेमका हाच प्रकार टाळण्यासाठी आता एमएमआरडीए, एएमआरसी आणि बेस्ट उपक्रम यांचे एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीसमोर सादर झाला. या प्रस्तावानुसार हुतात्मा चौक, सेनापती बापट रोडवरील अंबिका मिल आणि सीप्झ येथे बेस्टच्या मालकीच्या जागेवर मेट्रो स्थानकांसाठी प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेश लिमिटेड यांच्यामार्फत राज्य सरकारकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या दरम्यान मेट्रो-३ प्रकल्प राबवला जात आहे. ३२.५ किलोमीटर आणि संपूर्ण भूमिगत असलेल्या या प्रकल्पात २७ स्थानकांचा समावेश असणार आहे. या २७ पैकी तीन स्थानकांच्या कामासाठी आणि इतर वाहतूक शाखांसह एकत्रिकरणासाठी मेट्रो-३ प्रकल्पाला बेस्टच्या जागेची गरज आहे. यात हुतात्मा चौक येथील मेट्रो स्थानकासाठी बेस्टच्या विद्युत उपकेंद्राची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. येथे सध्या असलेली अलाइस इमारत तीन मजल्यांची आहे.
या इमारतीची पुनर्बाधणी करून सहा मजली इमारत उभारण्यात येईल. सध्या तळ मजल्यावर असलेले हे उपकेंद्र पहिल्या मजल्यावर हलवण्यात येईल. तर तळ मजल्यावर मेट्रो स्थानकासाठी प्रवेश असेल.सीप्झ येथील मेट्रो स्थानकाच्या उभारणीसाठीही बेस्ट आपल्याकडील जागा देणार आहे. येथे व्यावसायिक संकुल उभारण्यात यावे, अशी एमएमआरडीएची योजना होती. मात्र बेस्टने त्याला हरकत घेतली आहे. त्याचप्रमाणे अंबिका मिल येथील बस स्थानकाच्या जागीही व्यावसायिक संकुल उभारण्याची योजना एमएमआरडीएने आखली होते. मेट्रोचे स्थानक या बस स्थानकापासून १०० मीटर अंतरावर आहे. मात्र बेस्टने या स्थानकाच्या व्यावसायिक उभारणीसाठीही नकार दिला आहे. मेट्रो स्थानकापासून १०० मीटर भुयार बांधून ते बेस्ट स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. या तीन ठिकाणी बेस्ट आणि मेट्रो यांचे एकत्रिकरण झाल्यामुळे बेस्टलाही फायदा होणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले. मात्र या सर्व प्रकल्पाचे सादरीकरण एमएमआरडीएने समितीसमोर करावे, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली. गुप्ता यांनी या मागणीबाबत होकार दिला.