मालवणी येथील प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलिसांत तक्रार

मालवणी येथील खारफुटीलगत तसेच केंद्रीय विद्यालयानजीकच्या तलावात नौदलाकडून टाकण्यात आलेल्या भरावाचे काम हे खारफुटीच्या ५० मीटर परिसरात येत असल्याने तातडीने थांबवण्याचे पत्र उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नौदल अधिकाऱ्यांना पाठवले आहे. याबाबत भराव टाकणाऱ्या कंपनीविरोधात पोलीसांत जानेवारीमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे, मात्र नौदलाकडून भराव सुरूच राहिला आहे.

मार्वे येथे आयएनएस हमला या नौदलाच्या कार्यालयाकडून जवळच असलेल्या सर्वेक्षण क्रमांक ५० ए या भागात ४.८८ हेक्टर जागा असून त्यातील ३.८८ हेक्टर जमीन संरक्षित वनक्षेत्रात येते. सध्या या जमिनीचा ताबा नौदलाकडे आहे.

या जागेत नौदलाने डिसेंबरपासून भराव टाकण्यास सुरुवात केली. तब्बल तीन हेक्टरवरील २० फूट उंच भरावाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. त्यानंतर बोरिवली तहसीलदार, तलाठी, वनरक्षक, गोरेगावच्या शहर सर्वेक्षण अधिकाऱ्याचा प्रतिनिधी आणि आयएनएस हमला या नौदलाच्या विभागाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत २५ जानेवारी २०१६ रोजी या भागाची पाहणी करण्यात आली व त्याच दिवशी भराव टाकणाऱ्या कंत्राटदाराविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली.

पर्यावरण अधिनियम १५ अंतर्गत कंत्राटदार अंगद चौरसिया यांना यासंदर्भात अटक करण्यात आली, त्यांची नंतर जामिनावर मुक्तता झाली. मात्र भराव टाकण्याचे काम सुरूच राहिल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एप्रिल महिन्यात आली आहे. त्यावर अहवाल न्यायालयात सादर करणार आहोत, असे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद खेतले म्हणाले. उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी आयएनएस हमलाचे लेफ्टनंट कमांडर अशोक गौर यांनाही याबाबत पत्र लिहिले आहे. तुमच्याकडून नियुक्ती केलेल्या कंत्राटदाराविरोधात कारवाई झाल्यानंतर भरावाचे काम थांबवण्यात न आल्याबद्दल या पत्रात तीव्र नापसंती दर्शवण्यात आली. नौदलाच्या केंद्रीय विद्यालयाजवळ असलेल्या तलावातही भराव टाकल्याची दखल या पत्रात घेण्यात आली. खारफुटीलगत ५० मीटरवर भराव टाकणे हा उच्च न्यायालयाच्या ६ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्या गेलेल्या निकालाचा तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याच्या १४, १५ व १९ कलमांचा भंग करणारे बेकायदेशीर कार्य थांबवण्याची विनंती केली आहे. ‘विरोध करूनही नौदलाकडून भराव टाकण्याचे काम सुरूच राहिल्याने आयएनएस हमलाच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी पत्राद्वारे कळवण्यात आले. अद्याप त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही,’ असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

नौदलाकडून समर्थन

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मात्र सर्व भराव कायदेशीर असल्याचे सांगितले. मालवणी येथील सर्वेक्षण क्रमांक ५० ए आणि तलावाची जागा नौदलाची आहे. सपाटीकरण करण्यासाठी त्यात भराव टाकण्यात आला. हा भराव खारफुटीपासून ५० मीटर अंतरात येत नाही. नौदलाच्या जागेवर पार्किंगचा व्यवसाय करणाऱ्यांना आम्ही हटवले आहे, खारफुटीच्या ठिकाणी कुंपण घालता येत नसल्याने नौदलाच्या जागेवरच सातत्याने अतिक्रमणे होत असतात, असे नौदलाच्या पश्चिम विभागाचे जनसंपर्क अधिकारी कमांडर राहुल सिन्हा यांनी सांगितले.