राज्यात दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला व अन्य दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात येत्या २८ नोव्हेंबरला रिडल्सच्या धर्तीवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, फुले-शाहू-आंबेडकरवादी संघटना, डावे पक्ष-संघटना, साहित्यिक, कलावंत सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, प्रा. जोगंद्र कवाडे व अन्य आंबेडकरी चळळीतील नेते एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात जातीय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन रिडल्स आंदोलनाप्रमाणे मुंबईत एक विराट मोर्चा काढावा हा मुद्दा ठिकठिकाणी होणाऱ्या बैठकांमध्ये मांडला जाऊ लागला. रविवारी पुणे येथे प्रकाश आंबेडकर, भारत पाटणकर, गौतमीपुत्र कांबळे, देवेंद्र इंगळे, संभाजी भगत आदी विविध संघटनांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी मुंबईत सर्व संघटनांनी एकत्र येऊन संयुत्त मोर्चा काढावा असे ठरल्याची माहिती, प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकावरुन १९८७-८८ मध्ये मोठा वाद पेटला होता. त्यावेळी रिपब्लिकन व अन्य संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन कृती समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या वतीने मुंबईत सुमारे १० लाखांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे सरकारला हस्तक्षेप करुन हा वाद मिटवावा लागला. राज्यात सध्या दुर्बल वर्गावार होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात सर्वानी एकत्र येऊन अशा घटनांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे, त्यासाठी शक्तप्रदर्शन करण्याची गरज आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे आता सर्वानी एकत्र येऊनच विराट मोर्चा काढावा, असे प्रयत्न सुरु आहेत. २८ नोव्हेंबरला जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे. त्यादिवशी जिजामाता उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा निघणार आहे.