राज्यात दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, व अन्य दुर्बल घटकावर होणारे अत्याचार, जवखेडा दलित हत्याकांड आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले याचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवारी मुंबईत वेगवेगळे दोन विराट मोर्चे निघणार आहेत.
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकशाही समितीच्या वतीने भायखळा येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा निघणार आहे. तर दुपारी १२ वाजता खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमी ते इंदू मिल असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात भारिप-बहुजन महासंघ, शेकाप, माकप, भाकप, जनता दल, लाल निशान पक्ष, रिपब्लिकन पक्ष (सेक्युलर), इत्यादी संघटनांचा सहभाग आहे.
जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चाला बसपचे राष्ट्रीय सचिव सुरेश माने यांनी सक्रीय पाठिंबा दिला आहे. या मोर्चात बसपचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले. सेक्युलर मुव्हमेंटचे कार्यकर्तेही मोर्चात उतरणार आहेत. जातीय अत्याचाराने उच्छाद मांडला असताना झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केले याहे.
चैत्यभूमीवरुन इंदू मिलपर्यंत निघणाऱ्या आठवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात राज्यभरातील सुमारे ५० हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असे सांगण्यात आले. या दोन्ही मोर्चासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.     
जवखेडे हत्याकांडातील चौघांच्या नाकरेला नकार
नगर: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील तिहेरी दलित हत्याकांडप्रकरणी आणखी चौघांची नाकरे व अन्य न्यायवैद्यक चाचण्या करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळली. ही परवानगी मागणारा पोलिसांचा अर्ज पाथर्डी येथील न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. या निर्णयाने पोलिसांना धक्का बसला आहे.
न्यायदंडाधिकारी व्ही. एफ. चौघुले यांनी पोलिसांना ही परवानगी नाकारली. गेल्या सव्वा महिन्यातही पोलीस या हत्याकांडाचा तपास लावू शकलेले नाहीत. याबाबत यापूर्वी सहा संशयितांची नाकरे व अन्य न्यायवैद्यक चाचण्या पोलिसांनी केल्या आहेत. त्याच आधारावर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी पाथर्डी न्यायालयात आणखी चौघांच्या अशाच चाचण्यांसाठी परवानगी मागितली होती. मागच्याच आठवडय़ात हा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी गुरुवारी झाली. संबंधित चौघेही गुरुवारी सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होते.