देशात असहिष्णुतेचे वातावरणाबाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे केंद्रस्थान झालेला बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पोलिसांनी निदर्शनकर्त्यांना ताब्यात घेतले असून आमीरच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमीरने देशातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांमुळे चिंतीत झालो असून, माझी पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही सुचवले होते, असे आमीरने म्हटले होते. आमीरच्या या वक्तव्यावर समाजातील सर्व स्तरांतून टीका सुरू आहे. बॉलीवूडकर, नेते आणि नेटिझन्स विविध माध्यमांतून आमीरच्या वक्तव्याचा समाचार घेत आहेत. तर, हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमीरच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत थेट त्याचे निवासस्थान गाठले. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमीरच्या निवासस्थानाबाहेर त्याचे पोस्टर्स जाळून निषेध व्यक्त केला. तसेच आमीर विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.