शिवसेनेची मागणी; पालिका सभागृहात रणकंदन माजण्याची शक्यता

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करदात्या मुंबईकर रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार करण्याची मागणी करीत सत्ताधारी शिवसेनेने अप्रत्यक्षपणे परप्रांतीय रुग्णांना लक्ष्य केले आहे; मात्र याला इतर पक्षांकडून असलेला विरोध पाहता पालिका सभागृहामध्ये या मुद्दय़ावरून रणकंदन माजण्याची शक्यता आहे.

महापालिकेची तीन मोठी रुग्णालये आणि १६ संलग्न रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि दवाखाने असून तेथे सवलतीच्या दरात रुग्णांवर उपचार केले जातात. मोठय़ा रुग्णालयांमध्ये आधुनिक यंत्रणांच्या साह्य़ाने रुग्णावर उपचार केले जातात. त्यामुळे केवळ मुंबईतील रुग्णच नव्हे, तर महाराष्ट्रातील गावांमधून आणि आसपासच्या राज्यांतून मोठय़ा संख्येने रुग्ण पालिका रुग्णालयांमध्ये येत असतात. परिणामी, पालिका रुग्णालयांमध्ये कायम रुग्णांची प्रचंड गर्दी असते.

करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांचा वापर करून पालिका रुग्णालयांत येणाऱ्या सरसकट सर्वच रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जातात.

त्यामुळे करदात्या मुंबईकर रुग्णांना विनाविलंब आणि सुलभपणे उपचार मिळावेत यासाठी मुंबईस्थित वास्तव्याच्या पुराव्याच्या आधारे सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा आणि बाहेरून येणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी अधिक शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र सत्ताधारी शिवसेना वगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नव्हता.

आता शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगश सातमकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पुन्हा या विषयाला तोंड फोडले आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या रुग्णांना निवासस्थानाच्या पुराव्याच्या आधारे सवलतीत आणि प्राधान्याने आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी सातमकर यांनी केली आहे.

स्वस्त सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचे कर्तव्य पालिका आपल्या आरोग्य केंद्रांमधून पार पाडते. पालिका रुग्णालयांमध्ये सवलतीच्या दरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. त्यामुळे येथे मोठय़ा संख्येने रुग्ण येत असतात. इथल्या गर्दीमुळे मुंबईकर रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होतो.

तसेच त्यांना वैद्यकीय सेवेचा योग्य तो लाभ होत नाही. याची गंभीर दखल घेऊन मुंबईतील वास्तव्याचा पुरावा विचारात घेऊन मुंबईकर रुग्णांना सवलतीत आणि प्राधान्याने पालिका रुग्णालयांत वैद्यकीय उपचार करावे, अशी सातमकर यांची मागणी आहे. लवकरच ही ठरावाची सूचना पालिका सभागृहात सादर करण्यात येणार आहे.

भेदभाव नको

इतर रुग्णालयांच्या तुलनेत पालिका रुग्णालयांमध्ये कमी दरामध्ये उत्तम वैद्यकीय सेवा मिळत असल्याने मोठय़ा संख्येने रुग्ण मुंबईत येतात. हे रुग्ण कुठूनही येत असले तरी त्यांचे उपचार करताना मुंबईकर आणि परप्रांतीय असा भेदभाव करू नये. अन्यथा पालिका सभागृहात ठरावाची सूचना सादर झाल्यानंतर त्याला कडाडून विरोध करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे.