कमाल १० टक्के नफा घ्या, अन्यथा छाप्यास सामोरे जा: सरकारचा व्यापाऱ्यांना इशारा

तूरडाळीचे दर काही प्रमाणात उतरल्यावर आता चणाडाळीने उसळी घेतली असून साठेबाजी व नफेखोरीमुळे चणाडाळ, उडीद डाळीचे दर कडाडण्यास सुरुवात झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी पडत असल्याने आणि दसरा-दिवाळीच्या तोंडावर साठेबाजी सुरू असताना सरकार कारवाई करीत नसल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने दरवाढ करीत चणाडाळ १३० ते १४० रुपये प्रतिकिलोने विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहे. किरकोळ व्यापाऱ्यांनी डाळींवर जास्तीतजास्त १० टक्के नफा घ्यावा, अन्यथा धाडी घालून कारवाई सुरू करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिला आहे. दरम्यान, सणासुदीनिमित्ताने चणा, तूर, उडीद, मूग डाळींच्या मागणीत वाढ झाली असल्याने व त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने लातूर येथील डाळींच्या प्रमुख बाजारपेठेत १० टक्क्यांनी दर वाढले आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातील अन्य काही राज्यांमध्ये हरभरा, उडीद व काही प्रमाणात तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तर व्यापाऱ्यांकडून होणारी चणाडाळीसह काही डाळींची आयातही लांबली आहे. त्यामुळे मुंबई व परिसरातील किरकोळ दुकानदारांकडे आणि मॉल्समध्ये डाळींचे दर कडाडले आहेत.

चणाडाळीचे दर प्रतिकिलो १४० रुपयांपर्यंत पोचले असून दिवाळीच्या काळात या डाळीची मागणी वाढते. त्यामुळे ते प्रतिकिलो १८० ते २०० रुपयांपर्यंत जातील, अशी भीती काही किरकोळ व्यापारी व्यक्त करीत आहेत. उडीद डाळीचे दरही गेल्या वर्षीपासून चढेच असून आताही ते १६० ते १८० रुपये प्रतिकिलोच्या घरात आहेत. तूरडाळ १३० ते १५० रुपये प्रतिकिलो तर मूगडाळ, मसूरडाळ मात्र १०० रुपये प्रतिकिलोपेक्षाही कमी दरात उपलब्ध आहे.

दरघसरणीची आशा

घाऊक बाजारात चणाडाळीचा दर ९० ते १०० रुपये प्रतिकिलोच्या घरात असून किरकोळ बाजारात मात्र ते अधिक आहेत. त्यामुळे चणाडाळीसह अन्य डाळींसाठीही किरकोळ व्यापाऱ्यांनी नफेखोरी न करता वाजवी नफा घ्यावा व तो जास्तीतजास्त १० टक्क्यांपर्यंत असावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. व्यापाऱ्यांनी आयात केलेली चणाडाळ दोन आठवडय़ांत पोचल्यावर व बाजारात आल्यावर हे दर उतरतील, अशी आशा सरकारला वाटत आहे.

..तर वाटाण्याची डाळ खा

चणाडाळ व उडीद डाळीच्या वाढलेल्या दरांमुळे सरकारी यंत्रणेची धावपळ सुरू झाली असून दिवाळीच्या तोंडावर जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागू नये, यासाठी शिधावाटप नियंत्रक अविनाश सुभेदार यांनी बुधवारी होलसेल व किरकोळ व्यापारी असोसिएशन, सहकार भांडार, अपना बाजार, मुंबई ग्राहक पंचायत आदींच्या प्रतिनिधींची बुधवारी बैठक आयोजित केली होती. होलसेल व किरकोळ व्यापाऱ्यांना डाळींचे दर कमी करण्याचे व नफा कमी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र चणाडाळ महाग असल्याने वाटाण्याची डाळ जनतेने खावी, यासाठी प्रयत्न करण्याचा शहाजोगपणाचा सल्ला सुभेदार यांनी बैठकीत दिल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीच्या सल्लागार वर्षां राऊत यांनी दिली.  ही बैठक केवळ फार्स होता, अशी टीका राऊत यांनी केली.

वडापाव, झुणका भाकर महागणार?

चणाडाळीचे दर वाढत राहिल्यास सर्वसामान्यांचा वडापाव, झुणकाभाकर व भजीपावही महाग होण्याची भीती आहे. त्यासाठी सरकारने हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

लातूर बाजारपेठेतही दरवाढ

गेला आठवडाभर लातूर, उस्मानाबाद, बीडसह कर्नाटकातील गुलबर्गा, बिदर, विजापूर व आंध्र प्रदेशमध्येही जोरदार पाऊस झाल्याने त्याचा धान्य बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. तूरडाळ दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे.