राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या जीवनावरील ‘देशभक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी करत अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात पुण्यातील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज, शुक्रवारी  या याचिकेवर सुनावणी होणार आहे. गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशीच, ३० जानेवारी रोजी हा चित्रपट देशभर प्रदर्शित होत आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे सरचिटणीस मुन्नाकुमार शर्मा यांनी या चित्रपटाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘नथुराम गोडसे देशभक्त तर गांधीजी हिंदूविरोधी, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे,’ असे सांगितले होते. शर्मा यांच्या या विधानाला आक्षेप घेत हेमंत पाटील यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. न्यायाधीश एस. एस. नायर यांनी यावरील सुनावणी शुक्रवारी ठेवली. ३० जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटामुळे समाजातील धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या चित्रपटात आक्षेपार्ह असे काही नाही, हे चित्रपटाचे निर्माते न्यायालयात सांगत नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मीरत येथे गोडसे यांचे मंदिर बांधण्याचा घाट हिंदू महासभेने घातला आहे. त्यासाठी भूमिपूजनही नुकतेच करण्यात आले. त्यामुळे वाद निर्माण झाला असून उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.