पुण्याच्या तरुणीची गुन्हा रद्द करण्याची न्यायालयाकडे विनंती

पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा लग्न ठरण्यात अडसर होत आहे, आई-वडिलांनाही त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असा दावा करत एका तरुणीने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पुण्यातील शिरूर येथे राहत असलेल्या या तरुणीवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोप आहे. या शिवाय चिथावणी देणे, दुखापत करणे आणि घरगुती हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी फार्मसीचे शिक्षण घेत होती आणि एका डॉक्टरकडे काम करत होती. परंतु या डॉक्टरचे या तरुणीशी विवाहबाह्य़ संबंध होते, असा डॉक्टरच्या पत्नीचा आरोप होता. तसेच तिने पती व या तरुणीविरोधात तक्रार नोंदवली. ‘या विवाहबाह्य़ संबंधांमुळे पतीने माझी व मुलांची काळजी घेणे सोडून दिले आहे. त्याच्याकडे याबाबतचा जाब विचारला तेव्हा त्याने या तरुणीसमोरच मारहाण केली आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोपही तिने तक्रारीत केला होता. तिच्या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी या तरुणीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मात्र हे सर्व  आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या आरोपांमुळे लग्न जुळण्यात अडचणी येत असल्याचे तरुणीने स्पष्ट केले आहे.

तसेच, आई-वडिलांना त्यामुळे त्रास होत आहे, असा दावा करत या तरुणीने न्यायालयात याचिका केली आहे. त्यात तिने गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना आपले या डॉक्टरशी कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत. त्यामुळे त्याच्या पत्नीशी आणि गुन्ह्य़ाशीही आपला काहीही संबंध नाही. आपल्यावर फौजदारी कारवाई सुरू ठेवणे हे अन्यायकारक ठरेल. आपण काहीही केलेले नाही. आपण निर्दोष असून आपल्याला या प्रकरणी विनाकारण गोवण्यात आले आहे. गुन्ह्य़ामध्ये आपला सहभाग होता हे दाखवणारा कुठलाही पुरावा नाही, असा दावा करत या तरुणीने तिच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे.