शहरातील संशयास्पद हालचालींवर २४ तास नजर ठेवणारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुसज्ज यंत्रणा निर्माण करणारे पुणे हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. सुमारे २२५ कोटी रूपये खर्चून उभारण्यात आलेलया या सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण उद्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबईतीवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याची अन्य कोणत्याही शहरात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने हाती घेतली आहे. मुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पाचा नारळ काही दिवसांपूर्वीच फुटला असला तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे मात्र तब्बल १२४५ कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आली आहेत. जर्मन बेकरीत झालेल्या बाँब स्फोटानंतर तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही योजनाही गतीमान झाली होती. दोन्ही शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम मे अलाईड डिजिटल सर्विसेस लि. या कंपनीस देण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने दोन्ही शहरात कॅमेरे बसविले असून त्याच्या माध्यमातून शहरातील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शनिवारी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.