नववर्षांच्या स्वागत पार्टीत नेमके किती लीटर्स मद्यप्राशन केले जाते, याची अधिकृत आकडेवारीच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे उपलब्ध नाही. एकदिवसीय किंवा ३१ डिसेंबरच्या दिवशी झालेल्या मद्यविक्रीची वेगळी नोंद होत नसल्यामुळे लाखो लिटर्स मद्यप्राशन झाल्याचा दावा संदिग्ध असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाईन शॉप आणि बार यांच्याकडून स्वतंत्र मद्यविक्री होत असल्यामुळे ही आकडेवारी संकलित करण्यासाठी बराच काळ लागतो आणि ३१ डिसेंबरच्या मद्यविक्रीची स्वतंत्र नोंद ठेवण्याची पद्धत नाही, असेही या
सूत्रांनी स्पष्ट केले.
नववर्षांच्या पार्टीत विदेशी मद्य पुरविले जाणार असल्यास १२ हजार ५० रुपये तर फक्त वाईन पार्टीसाठी अकराशे रुपये भरून एक दिवसीय परवाना घ्यावा लागतो. एकदिवसीय परवान्यासाठी विभागाने राबविलेल्या मोहिमेमुळे मुंबई, ठाणे व रायगड येथे पावणेचारशे पाटर्य़ासाठी परवाने घेण्यात आल्यामुळे महसुलातही चांगली वाढ झाल्याचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ
यांनी सांगितले.