बॉलीवूडमध्ये नवीन वर्ष सुरू झाल्यापासून एकही ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. ‘टेबल नंबर २१’, ‘देहराडून एक्स्प्रेस’, ‘राजधानी एक्स्प्रेस’, ‘मटरू की बिजली का मन्डोला’, ‘इन्कार’, ‘मुंबई मिरर’, ‘मेरी शादी कराओ’, ‘रेस २’ असे चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाले. परंतु यातला बिग बजेट चित्रपट आणि बॉलीवूड स्टाईल मसालापटच लोकांना आवडला. त्यामुळे ‘रेस २’ या रेस चित्रपटाच्या सीक्वेलने गल्लापेटीवर बाजी मारण्यात यश मिळवले.
प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवडय़ात जवळपास ५१ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने गोळा केला. सीक्वेलपटाच्या या यशामुळे बॉलीवूड फॉम्र्युला आणि बडे कलावंत असले तरच चित्रपट हीट ठरतो या गणिताला पुष्टी मिळाली आहे.
जानेवारीच्या पहिल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट वेगळे विषय हाताळणारे आणि बडे कलावंत नसलेले चित्रपट होते. दुसऱ्या व तिसऱ्या आठवडय़ातही ‘रेस २’ वगळता ‘इन्कार’, ‘मटरू..’ या चित्रपटांच्या कच्च्या कथानकांमुळे चित्रपटांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. म्हणूनच प्रेक्षकांनी ‘रेस २’ हा सीक्वेलपट पाहणे पसंत केले असावे असा बॉलीवूड विश्लेषकांचा अंदाज आहे.
चित्रपटाचे वेगवान कथानक, सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम, अब्बास मस्तान यांचे दिग्दर्शन याबरोबरच सीक्वेलपट असल्यामुळे मूळ चित्रपटाच्या लोकप्रियतेचा फायदा या चित्रपटालाही झाला असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या बरोबरच एक पडदा चित्रपटगृहांमध्येही प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. चित्रा सिनेमाचे राकेश सिप्पी म्हणाले की, प्रदर्शनाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी चित्रपटगृह १०० टक्के भरले होते. परंतु, रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी त्यात काहीशी घट झाली.
भारताबाहेरील बाजारातही चित्रपटाने ३.२ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. इंग्लंड, पाकिस्तान, अरब अमिराती, अमेरिका या देशांमध्ये प्रत्येकी एक दशलक्ष डॉलर्सच्या आसपास कमाई ‘रेस २’ने केली. विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये ‘दबंग २’ पेक्षा ‘रेस २’ ने गल्लापेटीवर बाजी मारली.
सिनेमॅक्स इंडियाचे अधिकारी गिरीश वानखेडे म्हणाले की, परदेशी रम्य पर्यटनस्थळे, भव्य लोकेशन्स सेट्स, बडे कलावंत, बऱ्यापैकी श्रवणीय संगीत असलेले ‘रेस २’ सारखे चित्रपट दर दोन-तीन महिन्यांतून प्रदर्शित होत राहिले तर मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांची संख्या वाढू शकते.