शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून निर्माण झालेल्या वादात आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उडी घेतली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून नेहमीच भाजपला लक्ष्य करण्यात येते. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज थेट ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर टीका करत सर्व हिशोब चुकते केले. कार्यकारी संपादकांचे आजपर्यंतचे उपद्व्याप पाहता त्यांनाच ‘कार्टून’ म्हणावेस वाटते, असा उपरोधिक टोला त्यांनी राऊतांना लगावला. तसेच संपादकांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्यात जाहीर माफी मागावी, अशी मागणीही शेलार यांनी केली. शिवसेनेशी आधीच ३६ चा आकडा असणाऱ्या शेलार यांची ही जाहीर टीका सेनेला चांगलीच झोंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांमध्ये नव्याने वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेलार यांच्या या टीकेला सामनातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याची उत्सुकता आता अनेकांना लागली आहे.

तत्पूर्वी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सेनेला लक्ष्य केले. ‘सामना’तील व्यंगचित्रातून महिला आणि शहिदांचा अवमान झाला असून यातून शिवसेनेचा शहिदांप्रती असलेला कळवळा ढोंगी असतो हे स्पष्ट झाले अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.  सरकारने सामनाला दिल्या जाणा-या जाहिराती बंद कराव्यात  अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सामनामध्ये मराठा समाजाच्या मोर्चावर व्यंगचित्र छापून आले होते. या आक्षेपार्ह व्यंगचित्रावरुन मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आणि शिवसेना अडचणीत सापडली.  या व्यंगचित्रावरुन सोशल मीडियापाठोपाठ राजकीय नेत्यांनीही टीकेची झोड उठवली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विटरद्वारे शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ‘सामना’च्या कार्यालयावर झालेली दगडफेक ही मराठाच्या समाजाच्या संतापाचे प्रतिक असून या व्यंगचित्रातून शिवसेनेची नकारात्मक मानसिकता दिसून येते अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. शिवसेना दलित आणि मुस्लिमविरोधी होतीच पण आता मराठा विरोधीही असल्याचे या व्यंगचित्रातून दिसून येते असे ते म्हणालेत. मराठा समाज, महिला, पोलिस आणि जवानांची उद्धव ठाकरे यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.   ‘सामना’तील व्यंगचित्रांशी राज्य सरकार सहमत नसेल तर त्यांनी सामनावर फौजदारी  कारवाई करावी तसेच त्या वृत्तपत्राला मिळणा-या जाहिरातीदेखील बंद कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

सामनातील व्यंगचित्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेवर टीका केली होती. या व्यंगचित्रातून शिवसेनेची मराठा आरक्षणाबाबतची मानसिकता दिसून येते, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले.  तर दुसरीकडे सामनातील व्यंगचित्रावरुन तोडफोडीचे राजकारणही सुरु झाले आहे. सामनाच्या वाशी आणि नवी मुंबई कार्यालयावर शाईफेक तसेच दगडफेक करण्यात आली होती. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सामनातील व्यंगचित्र शिवसेनेला राजकीयदृष्ट्या महाग पडण्याची चिन्हे आहेत.